वाचताना वेचलेले
☆ ऊन ऊन खिचडी, साजूकसं तूप… – कवी : मो. दा. देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆
☆
ऊन ऊन खिचडी साजूकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख.
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं त्यो बाजारच सारा.
सासूबाई – मामंजी, नणंदा नि दीर,
जावेच्या पोराची सदा पिरपिर.
पाहुणेरावळे सण नि वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहांमध्ये दिलं ही बाबांची चूक,
वेगळं राहायचं भारीच सुख…
सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचू तो विंचू.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर झिलपी.
बाबांची माया काय मामंजींना येते?
पाणी तापवलं म्हणून साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अंतरच खूप,
वेगळं राहायचं भारीच सुख….
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघांत तिसरा म्हणजे डोळ्यांत कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नि दूर दूर फिरायचं.
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील साऱ्या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकूट अन् दह्याची साय,
त्यावर लोणकढं साजूक तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख….
रडले पडले नि अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांचं काही कळतच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहू नाही.
ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,
घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडलं तर ते खपायचं नाही,
मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.
स्वयंपाक करायला मीच,
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,
वेगळं राहायचं कळायला लागलं सुख….
सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची,
नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नि आवडी,
बारा महिन्याला एकच साडी.
थंडगार खिचडी, संपलं तूप,
अन् वेगळं व्हायचं कळलं सुख!
☆
कवी: प्रा. मो. दा. देशमुख
प्रस्तुती:सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान कविता