श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ अभिजात मराठी… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
योगर्टच म्हणणार जरी
असलं साधं दही,
इंग्रजीतच करणार आम्ही
लफ्फेबाज सही !
मालिका नाही तर सारे
सिरियलच म्हणू,
नोटबुक कुठे विचारू,
पण म्हणणार नाही वही !
गाडीमध्ये जागा नसते
असते फक्त सीट,
मनासारखं झालं नाही तर
म्हणणार ‘ओह शीट‘,
म्हणणार नाही ‘अरे देवा‘,
म्हणू ‘ओ माय गॉड‘,
‘थुंकू नका‘ सांगणार नाही,
म्हणू ‘डू नॉट स्पिट‘ !
बैठक नसते आमची कधी
होल्ड करतो मिटिंग,
विद्युत रोषणाई करत नसतो,
करतो पण लायटिंग !
छान दृश्य नसतं आता,
वंडरफुल सीन,
पैज लावणं गावठीपणा,
करायचं तर बेटिंग !
कणसं नसतात भाजायची,
रोस्ट करायचे कॉर्न,
शोकसभा कुठून होणार,
करू आता मॉर्न,
वेडंवाकडं दिसता काही
अश्लील नका म्हणू,
डोळा मारत म्हणायचं
अॅडल्ट आणि पॉर्न !
बाबा कधीच मोडीत गेले
आता फक्त डॅडी,
कार घेतली म्हणायचं
नाहीतर म्हणाल गाडी,
आई कधीच मम्मी झाली
आत्याबाई आंटी,
पल्स बघतात आजारपणात
नाही बघत नाडी !
न्यायालय नसतं इथं
कसं सुप्रीम कोर्ट,
पारपत्र ठाऊक नाही,
असतो पासपोर्ट,
पोर्ट असतं, शिप असतं
नसतं जहाज, बंदर,
दिवाळीचा किल्ला सुद्धा
झालाय आता फोर्ट !
खरं तर टॉमीलाही
मराठी नाही आवडत,
कम हिअर म्हटल्यावरच
येतो कसा दौडत !
जस्ट लिव्ह एव्हरीथिंग
सॉलिड न्यूज भेटली,
अभिजातची ग्रेड आपल्या
मराठीनं गाठली,
जेव्हा आय हर्ड तेव्हा
हार्ट आलं भरून,
इमोशन प्राईडची या
मनामध्ये दाटली !!
आफ्टरअॉल मराठी
मदरटंग आपली,
जरी आहे काळजामध्ये
मागच्या खणात लपली,
मराठी शाळा पाडून तिथं
इंग्रजी शाळा बांधली
काल आमच्या मंत्र्यांनी
फीत आहे कापली !!
पार्टीशार्टी, ड्रिंक्स करू
टेरेसवरती आज,
मराठीची फायनली
व्हिक्टरी झाली आज,
मदरटंग आहे आपली
खूप वाटतंय भारी,
माय मराठी घेऊन आली
अभिजातचा साज !
☆
कवी : अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈