सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

बॅग भरून निघून जाऊ नका… – लेखक – प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(दुर्गुणांकडे डोळेझाक आणि सद्गुणांचा जप)


ज्या झाडांना पाणी मिळत नाही 

ते झाड सुकतं, वाळतं, जळून जातं !

अगदी त्याच प्रमाणे 

ज्या नात्याला प्रेम मिळत नाही 

ते नातं दुरावतं, तुटतं, संपून जातं !

नातं भावा भावाचं आहे, का बहिणी बहिणीचं आहे, का बाप लेकांचं आहे,

का नवरा बायकोचं आहे, हा भाग महत्वाचा नसून, त्या नात्यात प्रेम आहे का नाही हे महत्वाचे आहे !

 

आता प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे वारंवार भेटावं वाटणं, बोलावं वाटणं, काहीतरी देणं किंवा काहीतरी घेणं !

प्रेम म्हणजे आदर,

प्रेम म्हणजे काळजी,

प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल चांगलं चिंतनं !

 

तुझं, माझं, मीच का ? तू का नाही ? या शब्दांच्या पलीकडे जाऊन केलेली स्नेहाची बरसात म्हणजे प्रेम !

हवंहवंसं वाटणं म्हणजे प्रेम आणि नकोसं वाटणं म्हणजे दुरावा !

दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम आणि दुरावा 

वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे वीट येणे म्हणजेच घटस्फोटाची तयारी !

 

सतत एकमेकांच्या दुर्गुणावर बोट ठेऊन टोमणे मारणे हे प्रेम नाही !

 

नेहमी नेहमी तो कसा वाईट आहे आणि मी कसा चांगला आहे याची जाहिरात करणे, आणि सातत्याने एक दुसऱ्याची तक्रार करणे म्हणजे प्रेम नाही !

 

तुम्ही फक्त एकमेकांकडून अपेक्षाच करणार असाल,

काहीच न देता फक्त मिळण्याचीच आशा करत असाल,

सारखं सारखं चुका दाखवून फक्त उनी दुनि काढत असाल,

तर आपल्यातल्या प्रेमाला ओहटी लागली आहे असे समजावे !

 

अशाने नातं नावाचं झाडं सुकू शकतं, जळू शकतं, तुटू शकतं !

 

अंगणातलं झाड जळू नये म्हणून जिवाच्या आकांताने प्रयत्न करणारी माणसं, नातीगोती किती सहजपणे संपवतात याचं आश्चर्य वाटतं !

 

त्यामुळे वेळीच सावध व्हा, लक्षात घ्या घटस्फोट हा एका क्षणात किंवा किंवा एका दिवसात घडणारी गोष्ट नसते !

भांडणातली frauency वाढायला लागली, अबोला धरण्यातला कालावधी जास्त वाढायला लागला की आपलं नातं संपुष्टात येण्याचा दिवस जवळ जवळ येत आहे ही गोष्ट नीट समजून घ्या !

ठिणगीचा वणवा होण्या आधीच ठिणगी विझवता येणं हे केंव्हाही चांगलं !

 

कागदावर पाठवलेल्या नोटीसी वर सह्या करून, दोघांनी विभक्त होऊन वेगवेगळ्या घरात रहाणे हा झाला कायदेशीर घटस्फोट !

परंतु एका छता खाली राहून, न बोलणे, न पटणे, एकमेकांची काळजी न करणे, एकटे-एकटे राहणे, जवळ असून एकमेकां पासून मनाने खूप दूर जाणे हा सुद्धा घटस्फोटच आहे !

 

आपण प्रेम आहे म्हणून एकत्र रहाता का, लोक काय म्हणतील म्हणून एकत्र रहाता ? हा प्रश्न स्वतःला गंभीरपणे विचारा आणि एकमेकांना पटापट माफ करा !

अहंकार कुरवळण्यापेक्षा एकमेकांत विलीन होता आलं पाहिजे !

लक्षात घ्या समुद्र मोठा होईल म्हणून नदी तिचं विलीन होणं कधीही नाकारत नाही किंवा वाहण्याचा मार्गही बदलत नाही !

 

शेवटच्या क्षणी……. म्हणजे मांडीवर डोकं आणि तोंडात तुळशीचं पान ठेवतांना शहाणपणा येऊन, प्रेमाचे उमाळे फुटण्यात आणि माझं चुकलं म्हणून दोन्ही हात जोडण्यात काही अर्थ नसतो ! 

मृत्यू समोर दिसत असताना नात्या गोत्यांचा अर्थ कळून काहीही उपयोग नसतो !

 

म्हणून म्हणतो क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका

बॅग भरून निघून जाऊ नका

सिंगल रहाणं सोप्प नसतं, एक घरटं मोडून पुन्हा मी सुखी आणि आनंदी घरटं तयार करील, इतकी कठोर शिक्षा स्वतःला व आपल्या पार्टनरला देऊ नका !

म्हणून काय करावं ?

दुर्गुणांकडे डोळेझाक करा,

सद्गुणांचा जप करा,

कोणत्याच नात्याचा तिरस्कार करू नका,

आपलेपणाची आरती करून अहंकाररुपी कापूर जाळा

आणि स्नेहाचा प्रसाद वाटून एकमेकाला ” घालीन लोटांगण म्हणा “……. कदाचित बरेच प्रश्न मिटु शकतील !

लेखक / कवी : प्रा. विजय पोहनेरकर

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )

94 20 92 93 89

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments