सौ.अस्मिता इनामदार
वाचताना वेचलेले
मा मला दागिने दे—- प्रस्तुती सौ.अस्मिता इनामदार
चला विरक्ती आली,
दागिन्यांची आसक्ती संपली…
या बाह्य सौन्दर्यापासून आता,
मुक्ती हवीशी वाटू लागली !
पण सुंदर दिसण्याचा
स्त्रीसुलभ विचार,
डोक्यातून काही जाईना…
आणि दागिन्याची हौस मनाला,
स्वस्थ काही बसू देईना !
मग मी रामाकडे घेतली धाव,
म्हणाले, तूच यातून मला सोडव…
तू माझा सोनार हो….आणि
माझे दैवी दागिने घडव !
चेहर्यासाठी माझ्या घडव
सुहास्याचा दागिना…
मुखावर माझ्या कधी न उमटो
मनातली विवंचना !
कानासाठी माझ्या घडव,
तू असे सुंदर झुबे…
माघारीही माझ्याबद्दल,
चांगलंच ऐकू येऊ दे !
गळ्याभोवती माझ्या असूदेत,
सतत आप्तजनांचे हात…
काय करायचेत आता मला,
चंद्रहार आणि पोहेहार ?
पाटल्या बांगड्या यांनी आजवर,
शोभा वाढवली हाताची…
आता वेळ आलीय,
हात दानाने मोकळे करण्याची !
वेळोवेळी सजली माझी
मेखला कंबरपट्टा यांनी कंबर…
आता तिची खरी शोभा,
ती ताठ आहे तोवर !
जोडवी अशी जड घडव,
की पाय जमिनीवरच राहतील…
आता सांग हे रामा
हे सारे दागिने केव्हा देशील,
दैवी दागिन्याची माझी मागणी ,
रामचंद्र सोनारानं नोंदवून घेतली…
“जरा वेळ लागेल” अस म्हणत,
स्वत:ची भूमिका स्पष्ट केली
हसतच वदला रामराया…….
“अहो ,हे दागिने तयार नसतात,
कारण त्यांना तेवढी मागणी नसते..
पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत,
घेणाऱ्या भक्ताची, (पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी,
एवढीच माफक अपेक्षा असते !
घडणावळीची काळजी नको,
कारण आम्ही ती घेतच नाही..
रामनाम चालू ठेव
दागिने लवकरच घरपोच होतील
असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं…खरेतर हाच माझा छंद..
त्यासाठीच मी छातीवर हात ठेवून उभा आहे…
तुझ्या सारख्या अनोख्या भक्तांची वाट पहात…
कारण भक्तांच्या इच्छा पुरविणे, भक्तांचे भय नाहीसे करणे..
हेच तर माझे कर्तव्य….?
प्रस्तुती : सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈