वाचताना वेचलेले
☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-1 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆
”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा! ” मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच !
आज मी मानसशास्त्रातील डिग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला. मी म्हटलं,”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे,मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात…एखाद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून ! ” बाबा म्हणाले,” आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरूण आहे- तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ” हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका,पण एक अडचण आहे…त्याचं एक लग्न झालंय आधीच ! ” माझ्या चेह-यावरचं भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले,
” अगं आर्मी ऑफिसर आहे तो…तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच. ” माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो ! ” त्यावर बाबा म्हणाले,
” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन.डी.ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…स्वोर्ड ऑफ ऑनर ! हमने तुम्हारे लिए बात चलायी है….! “ यानंतर बाबा माझ्याशी,आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझं कशातही लक्ष नव्हतं ….मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं ? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं….माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला. मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. (हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रॅंक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या…बाबा म्हणालेच होते…बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे !) बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिन साहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले..वर्ष होते १९८५! साहेबांचं पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. वन्स अॅन आर्मीमॅन…ऑल्वेज अॅन आर्मीमॅन च्या चालीवर मीही आर्मीवुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंब-यापेक्षा त्यांचं मन लाईन ऑफ अॅक्च्युल कंट्रोलवरच्या उंब-यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे ‘ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे सँभालू ? ‘ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियन मध्ये पहिलं पोस्टिंग झालेलं ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत, म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात ‘ चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर.
क्रमशः….
(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)
लेखक : – संभाजी गायके.
९८८१२९८२६०
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈