वाचताना वेचलेले
☆ कसाटा आईस्क्रीम आणि आजी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
१९७० ते ७५ च्या दरम्यान लग्नासाठी दिवसभर हॉल बुक करायचे. खास आमंत्रित दुपारी जेवायला आणि आम जनता, बिल्डिंग मधले, ऑफिसवाले संध्याकाळी स्वागत समारंभाला. कसाटा किंवा पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं, चौकोनी आकाराच्या स्लाईसचं आईस्क्रीम संध्याकाळी. काही वेळा आमच्या घरी स्वागत समारंभाचे आमंत्रण असायचे. हॉल दादर किंवा गिरगावातला असला तर वडील ऑफिसातून येताना जाऊन यायचे. आम्ही विचारलं की काय होतं पाहुण्यांसाठी तर म्हणायचे कसाटा. पार्ले, सायन, माटुंगा असेल, रविवारी असेल आमंत्रण तर आम्हा भावंडांपैकी एखाद्याला सोबत न्यायचे. घरी आल्यावर तोच संवाद.
तेव्हा आमच्याकडे आमच्या वडिलांची आई, निव्याची आजी होती. ७५ची. ती हे कसाटा नेहमी ऐकायची.
एकदा संध्याकाळी ती आईला म्हणाली… ‘उषा, हे कसाटा म्हणजे काय असतं ग? एकदा आण हं माझ्यासाठी! खाऊन तरी बघू. लग्नाला जाऊन आलात की, आईस्क्रीमच्या थरात सुका मेवा घातलेला तो केशरी, फोडीच्या आकाराचा तुकडा मुलुंड स्टेशनहून चालत चालत घरी कसा आणायचा. फ्रीज तर नव्हताच.. म्हणून आई म्हणाली ‘ हो. पण तुम्ही आणि सुवर्णा हॉटेलात जाऊनच खा तो. ‘
काहीच दिवसांत आईने मोजकेच पैसे देऊन मला आणि आजीला मुलुंड पूर्वच्या स्टेशनसमोर असलेल्या हाॅटेल अजित पंजाब मध्ये पाठवलं. दुपारी ४ वाजता. माझा हात घट्ट धरून आजी आणि मी चालत चालत २० मिनिटांनी पोचलो. तिथले वेटर, आजी आणि मला पाहून समजूतदारपणे पुढे आले. मी रूबाबात दोन कसाटा आईस्क्रीमची ऑर्डर दिली. आजी त्या उंच पाठीच्या, गुबगुबीत कोचमध्ये बुडून गेली होती. ए. सी. चा थंडावा, मंद दिवे, चकचकीत सन्मायकाची टेबलं, तुरळक वेटरचा वावर, उन्हातून आल्यावर पुढे आलेले थंडगार पाण्याचे उंच, काचेचे ग्लास, आपला जाड काचांचा चष्मा सारखा करत आजी मिटीमिटी पहात होती. सराईतासारखा आव आणत मी म्हटलं ‘ आजी, पाणी पी ना’ आणि मी स्टाईलमध्ये पाणी प्यायला लागले. आजी थोडीशी पुढे झाली, दोन्ही हातांनी काचेचा ग्लास सरकवत टेबलाच्या कडेवर आणून थंडाव्याचा अंदाज घेत चार घोट पाणी प्यायली.
तेवढ्यात एका ट्रेमध्ये ठेवलेल्या कसाटाच्या दोन डिशेस घेऊन वेटर आला आणि दोघींसमोर ठेवून गेला.
चमचे सावरत आजीने आधी कसाटा नीट पाहिलं आणि कडेने हळुवारपणे थोडंस्सं आईस्क्रीम चमच्यावर घेऊन जिभेवर ठेवलं आणि माझ्याकडे पहात मान डोलावली.
पुढची दहा मिनिटं बाकीचं सगळं विसरून आम्ही चवीचवीने कसाटाला न्याय दिला.
आलेलं बील पाहून, तेवढेच पैसे ठेवून, आजीचा हात धरून मी बाहेर पडले. चालत चालत घरी आलो.
कपातील ५५ पैशाला मिळणारं जॉय आईस्क्रीम कधीतरी घरी आणून खायचो आम्ही, पण असं फक्त आईस्क्रीम खायला दुपारी चार वाजता आजीला आईने पाठवणं यातला स्नेह कळायला बरीच वर्षं उलटावी लागली.
ते लक्षात ठेवून मी एखाद्या आजी आजोबांना भेटायला जाताना आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या, पण त्यांच्या साठी अपूर्वाई वाटेल असा उसाचा रस, बर्फाचा गुलाबी गोळा, बडीशेपेच्या रंगीबेरंगी गोळ्या, ओली भेळ आवर्जून नेते.
आज आजीही नाही, आईही नाही…
पण आजही कधीतरी हॉटेलात जाऊन कसाटा खाताना आधी आई, मग आजीच आठवते.
आईस्क्रीम जरा जास्तच मलईदार लागतं आणि कडेचा तो पावाचा तुकडा अगदी नरम होऊन जातो.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈