वाचताना वेचलेले
☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-2 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆
( तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ पदी निवड होईतोवर.) इथून पुढे —–
त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर दोन फुलांसारख्या मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या, जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया, चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरूण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. ‘ आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर?’ हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं लागतो…मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपीडितांसाठी केलेल्या कामाचा अनुभव या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते..एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी…शोभली तर पाहिजेच ना ? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते..आणि ते स्वत: एक स्टार…मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार…दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलवारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिनसाहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हॅंडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे…पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली…
ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली…आणि मी ती आनंदाने साधतही होते….शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association)ची प्रमुखही झाले होते…साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते…वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती…एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला मिळत असे..
८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते…आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे..त्यांच्या हातात हात घालून !
(सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहका-यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली !
—-जय हिंद ! जय हिंद की सेना ! )
समाप्त
(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)
लेखक : – संभाजी गायके. ९८८१२९८२६०)
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈