वाचताना वेचलेले
☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने “दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” या ध्यानमंत्राविषयी मिळालेली थोडी माहिती —-
दिगंबरा हा मंत्र प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मानंद येथे शके १८२५ साली स्फुरलेला १८अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेशमंत्र ,गणेशबीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्नीबीजाचाही वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे.
त्याचा अर्थ पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वरांनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे –
या मंत्रात “अहं ब्रह्मास्मि” मी ब्रह्म आहे, आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला– म्हणजेच उपाधि नसलेला. हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहं अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत अनादि असून ब्रह्मच आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे.
पुढच्या दिगंबराचा अर्थ आहे दिशांनी वेढलेला म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी— –त्रिकालाबाधित.विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही. ‘हे ईश्वरस्वरूप आहे तेव्हा सर्वव्यापी अशाप्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे.’ हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपादवल्लभ, ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते.
श्रीपादवल्लभ हा या मंत्रातला तिसरा शब्द. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. “श्रीः पादेयस्य”–ज्याच्या चरणाजवळ श्री आहे. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तीयुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपादवल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे.
ईश्वर स्वरूप, ब्रह्म स्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरूस्वरूप ही सर्व एकच आहेत. त्याचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे.’ कामक्रोधांनी त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या ‘ अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे.
अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे. या मंत्रामुळे साधकाची देहशुध्दी आणि चित्तशुध्दी होते. शरीर तेजस्वी होते. साधक दिव्यानुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे.
संग्राहक :- श्री सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈