श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
वाचताना वेचलेले
☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..
कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाशांत काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..
त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..
त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..
‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..
एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..
‘ हा आपली तक्रार करतो की काय? याला इथं उतरायचं तर नसेल? वेडा तर नाही?’ सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..
काहींनी तर त्याला बावळट,मूर्ख म्हणत शिव्याही घातल्या..
तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,” कुणी आणि का साखळी खेचली रे ?”
साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला– ‘ मी खेचली.’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,” मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”
“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा? ” गार्ड अद्यापही रागातच होता..
“ महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”
“अच्छा एवढी हुशारी? चल बघूनच घेऊ”– म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..
फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता, आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते..
हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..
त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतुक करू लागले..इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव? ’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..
“मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे”
त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..
लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेश्वरैय्यांनी हसत विचारलं..
“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”
“ मला तर नाही बुवा काही आठवत. ” मंद स्मित करत विश्वेश्वरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..
१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘ स्थापत्य अभियांत्रिकी ’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..
आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच —-
त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे, इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..
१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा ‘ मुख्य अभियंता ‘ म्हणून नियुक्ती झाली. सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..
तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली, कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..
‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेश्वरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकीय वकुबाचं प्रतीक ठरलं..
आता सोपं वाटत असेल, पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती. आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपूर्णपणे आयातीवर अवलंबून होता. आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..
जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेश्वरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं, आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..
क्रमशः….
— प्रज्ञावंत देवळेकर
संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈