सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
तसा मी खूप व्यावहारिक माणूस आहे. जाताना माझ्या आईने मला सांगितले होते.
“मिलिंद… तुला सुखी राहायचे असेल तर फक्त एकच गुण तुझ्या अंगी बाणवून घे, ‘जितक्या लवकर एखाद्याशी जोडला जाशील, तितक्याच लवकर त्याच्यापासून दूर होता आले पाहिजे’. थोडक्यात मोह धरला तर दुःखी होशील. “
ही गोष्ट मी इतकी मनाशी रुजवली आहे की जो पर्यंत कुणी माझ्या सोबत आहे, मी त्याचा असतो. ज्यावेळी तो दूर जातो, मी त्याला विसरून जातो. कुणाला हा दुर्गुण वाटू शकतो पण माझ्यासाठी तो गुण आहे. बरे ही गोष्ट माझ्या मनात इतकी घट्ट बसली आहे की अनेकदा लोकांना मी पाषाणहृदयी वाटतो. आई असताना मी कायम तिचा सारथी असायचो. तिला कुठेही जायचे तरी तिच्यासोबत मी असणारच. तिच्या आजारपणातही मी तिच्याजवळच बसलेला असायचो. त्यामुळे त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता, आई गेल्यावर याला किती त्रास होईल? पण ती ज्या दिवशी गेली त्याच दिवसापासून माझे हसणे, विनोद करणे चालू झाले. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. सकाळी आई जाते आणि संध्याकाळी हा हास्यविनोद करतोय? म्हणजे याचे वागणे खोटे होते की काय? हे मला त्या लोकांच्या चेहऱ्यावरही दिसून यायचे. पण माझ्यात काही फरक पडला नाही. आजही मी तसाच आहे.
हे सगळे आठवण्याचे कारण… काल खूप दिवसांनी भद्रकाली मंदिरात गेलो होतो. पायऱ्या चढताना मनात विचार आला, या पायऱ्या बोलू शकल्या असत्या तर किती छान झाले असते? माझी पणजी ( माझ्या आईची आजी ) आणि माझी आजी कायम दर्शन झाल्यावर या पायऱ्यांवर बसलेल्या असायच्या. माझ्या आईचे बालपण याच पायऱ्यांवर खेळण्यात गेले. मीही माझ्या आईला अनेकदा इथे दर्शनाला घेऊन आलेलो.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमीच्या ठिकाणी पादत्राणे काढली आणि देवीसमोर जाऊन उभा राहिलो. मागे कीर्तन चालू होते. ऐकायला ८/१० लोकच असतील. देवीची मूर्ती खूपच छान दिसत होती. दर्शन घेताना मला माझी आई आठवत होती त्यामुळे आपोआपच डोळे भरून आले. आई ज्याप्रमाणे देवीच्या पुढे बनवलेल्या पावलांवर डोके ठेवून दर्शन घ्यायची मीही अगदी त्याचप्रमाणे दर्शन घेतले आणि दरवाज्याजवळील आतल्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शांत बसून राहिलो. थोड्या वेळात काही स्त्रिया दर्शनाला आल्या. त्यांचे वय साठीच्या आसपास असेल. त्या प्रत्येकीत मला माझ्या आईच्या काही गोष्टी दिसू लागल्या. काहींची वेशभूषा माझ्या आईसारखी, काहीची केशभूषा आई सारखी. काहींचे चालणे, काहींचे बोलणे आईसारखे. आणि आपोआपच माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मनात म्हटले… आई काही आपल्याला सोडायला तयार नाही. हेहेहे…
काल रात्री खूप दिवसांनी आई स्वप्नात आली.
“बरे झाले… देवच पावला म्हणायचा. ” आईने म्हटले.
“कशाबद्दल?”
“वाकडी वाट करून देवीच्या दर्शनाला जाऊन आलास. एरवी कुणी सांगितले असते तर म्हणाला असतास, ‘देवीला मनातल्या मनात मनोभावे नमस्कार केला तरी पोहोचतो, त्यासाठी मंदिरातच का जायला हवे?” तिने हसत म्हटले आणि मलाही हसू आले. कारण अनेकदा तिने मला मंदिरात दर्शनाला चल म्हटल्यावर मी हेच वाक्य बोलायचो.
“हेहेहे… मी जरी मंदिरात जात नसलो तरी बाहेरून नमस्कार करतो. आणि कलियुगात हीच गोष्ट जास्त पुण्य देऊन जाते. “
“ठीक ठीक… पण मंदिरात जात जा असाच. मी तुला कायम तिथे भेटेल. कुणा ना कुणाच्या रुपात. ” तिने माझ्याकडे रोखून बघत म्हटले.
“आई… एक विचारू?”
“विचार… “
“मी, तू गेल्यावर रडलोही नाही, तू म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीचा मोह ही धरला नाही तरी मंदिरात गेल्यावर तुझ्या आठवणीने माझे डोळे का डबडबले?” मी विचारले तसे आईच्या चेहऱ्यावर नेहमीचे चिरपरिचित स्मित झळकले.
“कारण तू मोह धरला नसला तरी तुझ्या हृदयात प्रेम कायम आहे. त्यामुळेच तुला समोर येणाऱ्या स्त्रीमध्ये मी दिसते. तू कायम मला शोधत असतोस आणि मीही त्यांच्या रुपात तुझ्यासमोर येते. लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुला माझी गरज असेल, मी कायम तुझ्या जवळपास असेल. “
“अरे.. !!! मोह आणि प्रेम एकच ना?”
“नाही… मोह आणि प्रेम जरी वरकरणी एक वाटत असले तरी त्यात फरक आहे. मोहात स्वार्थ असतो, प्रेम निस्वार्थ असते. मोहात माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतो, प्रेमात दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो. मोह अल्पकालीन असतो, प्रेम कायमस्वरूपी असते. मोह बांधून ठेवतो, प्रेम कशातही अडकवत नाही. त्यामुळे याबद्दल फारसा विचार करू नकोस. जसा आहे तसाच रहा. ज्यावेळी तू मला कोणत्याही स्त्रीमध्ये बघशील, तिचा आदर करशील, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम टिकून राहील. ” आईने सांगितले आणि मला जाग आली. आई असताना भलेही मी स्वतःला तिचा सारथी म्हणवून घेत होतो पण माझी आईच खऱ्या अर्थाने माझी सारथी आहे. ज्यावेळी मी अर्जुनासारखा संभ्रमित होतो, ती श्रीकृष्णासारखी मला उपदेश करते. तुम्हीही ज्यावेळी संभ्रमित व्हाल, फक्त तुमच्या आईला आवाज द्या, ती कृष्ण बनून तुमच्या मदतीला हजर असेल यात शंका नाही.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मंजूषा ताई, खूप छान लेख!