सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

 “  “ लेखक : अनामिक प्रस्तुती : शोभा जोशी 

जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!


“आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.

क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही! “

… ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.

माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.

मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी, मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली.. “ माय फादर. ” मीही ‘गुडमॉर्निंग’ म्हणालो.

टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, “ हिच्या नावापुढे सही करा. “

मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, ‘खरेच एवढे बिझी आहोत का आपण? ’

विचारातच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, “ बसून बघा सगळे पेपर. ” असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.

मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ. अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२.

– – टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली. मीही मग चुकलेली प्रश्नोत्तरे बघायला लागलो.

.. उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.

मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची. तिने असं केलं.. की मी रागवू शकत नाही म्हणून.

“बाबा, इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं! “

“आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का? ” – मी.

“हो. सगळी माहीत आहेत. “

“मग ठीक आहे. चुकू दे उत्तर. मार्क मिऴालेत समज”

“कसं काय? ” ती गोंधळली.

“बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे. ” मी उत्तरलो.

ती परत ‘का? ‘

“कळेल नंतर! ” मी

मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो.

तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता.

मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.

अचानक काही तरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं, “ बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं? ”

“काहीच म्हणजे? “

“म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते? घरी कधी कधी दमवते, टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही! “..

मला हसू आलं.

मी तिला हसतच विचारलं, “तू शाळेत कचरा करतेस का? “

“नाही”. – ती.

“सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस? “

“हो”.

“तुझ्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते, ते तू कुणाला लागलं तर लगेच देतेस? “

“हो”.

“रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस? ‘

“हो”.

“नेहमी खरं बोलतेस? “

परत “हो”

“लगेचच मनापासून सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना?

‘हो बाबा हो.. किती विचारताय हो? ‘

“मग ठीक आहे बेटा. या बदल्यात थोडे मार्क गेले, अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग. ” मी म्हणालो.

“ का पण? “

“हेच तर शिकायचंय आता तुला”

“आणि मार्कं, शिक्षण, पहिला नंबर?

“बेटा दुसरीचे मार्क दाखवून जीवनात काही मिळणार नाही आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं. “

…. सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली,

“बाबा, मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे? “

तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, “सुसंस्कृत”.

…. परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली, “ त्यासाठी मी काय करायचं नक्की. ”

मीही लगेच तिला धीर देत म्हणालो, “फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा! “

“मग ठीक आहे बाबा” तिच्या जीवात जीव आला.

एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, “बाबा, माझा रिझल्ट काय होता? मी पाहिलाच नाही की? “

मी म्हणालो, “रिझल्ट? तू दुसरी पास होणार! “

…. पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली,

“म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना? “

मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत ‘Yes’ म्हणलं.

 

हीच खरी शिकवण कुठे तरी लोप पावत चालली आहे, आणि आपण चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत। 

…. जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!

लेखक : अनामिक

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments