मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? वाचताना वेचलेले ? 

☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले ☆  

(माझे वडील कै. वासुदेव त्र्यंबक भावे. यांनी 1930 ते 1946 या कालावधीत स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या ‘ मी एक भूमिगत ‘ या पुस्तकातील काही लेखांचे उतारे आणि त्या मंतरलेल्या क्षणांचा मागोवा घेतला आहे. यामुळे स्वातंत्र्य संग्रामात अनेक अज्ञातांनी केलेल्या त्यागाची ओळख होईल. या छोटेखानी पुस्तकास कै. ग. प्र. प्रधान सर या साहित्यिक व विचारवंत मित्राची प्रस्तावना लाभलेली आहे.)  

माझे नाव वासुदेव त्र्यंबक भावे. माझा जन्म ६ जून १९१५ चा. आमचे कुटुंब बऱ्याच पिढ्या भिवंडीत राहत होते. माझे मोठे बंधू श्री. बाबजी त्र्यंबक भावे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळे घरात राष्ट्रीय वृत्ती आणि देशसेवेचे वळण होते. त्याच वळणात मी वाढलो व माझा देशसेवेचा पिंड तयार झाला. त्या अनुषंगाने एक निर्भीडपणा व शिस्तही अंगी आपोआपच बाणली गेली. भिवंडीत इंग्रजी शिक्षणाची किंवा अन्य प्रकारच्या शिक्षणाची सोय नव्हती. परिस्थिती मुळे राष्ट्रीय पाठशाळेत शिक्षणासाठी गेलो. माझ्या वरच्या देशसेवेच्या संस्कारांचे दृढीकरण या राष्ट्रीय शाळेत झाले. भिवंडी येथे 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात मला भाग घ्यायला मिळाला. 1931 साली गांधीजी गोलमेज परिषदेला जाऊन आल्यावर कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली. तेव्हा आमची पाठशाळा सरकारी अवकृपेला बळी पडली. मी मात्र भिवंडीस परत आलो. 

काही दिवसांनी मला नगर होऊन पत्र आले. माझे मित्र डॉक्टर गोविंद जोग व श्री. न. पू. जोशी यांचे ते पत्र होते. त्यांनी मला आग्रहपूर्वक नगरला परत बोलाविले होते. नगरला परत आल्यानंतर मी चळवळीचे काम सुरू केले. रोज सायंकाळी गांधी मैदानात मुलांना जमवू लागलो. सायंफेरी सुरु केली. बुलेटीन काढू लागलो. सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सभेची व्यवस्था ठेवू लागलो. नगर मधील बऱ्याच लोकांना सत्याग्रह केल्यावरून पकडण्यात आले होते. त्यामुळे 3 जून 1932 रोजी कोणी सत्याग्रहीच मिळेना. म्हणून उर्वरित काँग्रेसचा सर्वाधिकारी म्हणून गांधी मैदानात मीच सत्याग्रह केला. मला ताबडतोब पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला सहा महिने सक्तमजुरी ही ठोठावण्यात आली. मी नगर पोलीस कस्टडीत होतो. तेथे रोज चक्कीचे काम करावे लागे. ७0 पाऊंड ज्वारी पीसावी लागे. तीन तासात ते काम पूर्ण करावे लागे. शेवटी शेवटी पोटातील आतडी गोळा होत व फार त्रास सहन करावा लागे. एवढ्या धान्यातून फक्त भुसा म्हणून साधारण अर्धा किलो काढावा लागे. सहा महिन्यांची शिक्षा संपल्यानंतर मी भिवंडीस परत आलो.

आता उपजीविकेसाठी काहीतरी करणे आवश्यक होते. भिवंडी येथील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये माझ्याजवळ असलेल्या कांदिवली व अमरावती येथील शारीरिक शिक्षण परीक्षांच्या जोरावर मला व्यायाम शिक्षकाची नोकरी मिळाली. श्री. ग. बा नेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1939 मध्ये एक ‘अभिनव चर्चा मंडळ’ स्थापन झाले होते. व्यायाम शाळेत येणाऱ्या आम्हा सर्व तरूणांचा त्यात सहभाग होता. पुढे सर्वजणांनी ‘चले जाव’ लढ्यात भाग घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या ‘चले जाव’  ठरावाच्या गोवालिया टँक वरील ऐतिहासिक अधिवेशनाला आम्ही सारे गेलो होतो. अभिनव चर्चा मंडळातील आमचा एक ग्रुप फोटो, आम्हाला पकडण्यासाठी पोलिसांच्या उपयोगी पडला. चळवळीच्या कामाचे दोन भाग होते. एक म्हणजे बुलेटीन-प्रचारसभा यांच्याद्वारे सरकार विरोधी वातावरण तयार करणे. दुसरी म्हणजे शासन यंत्रणा कमकुवत करणे व ती बंद पाडणे. अनायसेच माझी श्री भाई कोतवालांशी गाठ पडली. एका फार मोठ्या योजनेच्या संदर्भात, मी श्री कोतवालांच्या छावणीवर गेलो होतो. टाटा पॉवर हाऊस व पाण्याचे नळ तोडण्याचा कार्यक्रम होता. कोतवालांच्या छावणीत बॉम्बसदृश्य पदार्थ करून त्याचा उपयोग कचेऱ्यात व विशेषतः रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्याची योजना होती. असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले.

—-क्रमश:

प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈