वाचताना वेचलेले
☆ वीरु ने लिहिले जयला पत्र… सुश्री प्रभा हर्षे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
प्रिय जय,
तू जाऊन आता जवळजवळ चाळीस वर्षे झाली. आज एका फेसबुक समूहातील एका उत्कृष्ट उपक्रमाच्या निमित्ताने तुला पत्र लिहायची संधी मिळाली!
मित्रा, माझ्या जिवलगा आपल्या मैत्रीच्या वेळेपासून जग खूपच बदलले आहे. आपली साईड कार वाली येझदी आता भंगारात किलोच्या भावाने विकली जाते. तू वाजवत असलेला माऊथ ऑर्गन यांत्रिक वाद्यांच्या कोलाहलात गंज लागून पडून आहे. मारामारीसाठी आपण वापरत असलेले सुरे आणि पॉईंट टूटू रायफल आता फक्त पोलिसांकडे क्वचित आढळतात. घोडे तर आता टांग्याला देखील ओढत नाहीत. फक्त रेसकोर्सवर एखाद्या डर्बीत धावतात!
आपल्या रामगढ मध्ये आता माझ्यासारखी काही म्हातारी खोडं सोडली तर कोणीच राहात नाही. गाव ओसाड झालाय. सगळे शहराकडे गेले आहेत. शहरांचा श्वास घुसमटतो आहे . इथे आता लुटण्यासारखं काही नसल्याने डाकू यायची शक्यताच नाही. तसही आपण दोघांनी गब्बरला संपवल्यावर रामगढकडे वाकड्या डोळ्यांनी बघायची हिम्मत कोणत्याच डाकुत नव्हती. पण मित्रा गब्बर परवडला रे! अगदी त्याने तुला मारला असला तरी! तो दाखवून, सांगून, वागून खुलेआम डाकू होता. घोड्यावरून यायचा आणि गाव लुटून जायचा. पण हल्ली डाकू हसतमुख चेहर्याने कधी पांढरा, कधी काळा, कधी खाकी, कधी इतर कोणत्याही रंगात येतात. हसतमुख चेहरा, महागड्या गाड्या, सोफिस्टिकेटेड रुपात येतात आणि नकळत लुटून जातात. पूर्वी डाकू गावापासून लांब, जंगलात, डोंगरात राहायचे. आता ते आपल्या शेजारच्या घरात, नात्यात, रोजच्या व्यवहारात, रस्त्यात कुठेही असू शकतात. आता सामान्य माणूस डाकुंच्या वस्तीत रहातो आणि रोज विविध गोंडस नावाच्या धाडी पडून लुटला जातो.
असो. पण आपले दिवस खरंच मस्त होते रे मित्रा. खूप साधे आणि सोपे. माणसं काळी किंवा पांढरी होती. हल्ली दिसणारी करड्या रंगाची नरो वा कुंजारोवा जमात महाभारतानंतर हल्लीच परत उदयास आली आहे. त्यावेळी आपण दोस्ती केली ती खुल्या दिलाने आणि गब्बरशी दुश्मनी केली ती पण खुल्या दिलाने. हल्ली छातीत गोळ्या घालणाऱ्या शत्रू पेक्षाही पाठीत विषाच्या सुया टोचणारे मित्र जास्त आढळतात. म्हणून हल्ली कशातच मन लागत नाही. मी आपल्या जुन्या आठवणींच्या आनंदात सुख शोधत असतो. कधीतरी गब्बरच्या त्या अड्ड्यावर फेरफटका मारतो. आता तिथे दगड फोडून खडी बनवायची यंत्र लागली आहेत. ते सर्व कातळ, बसंतीने नाच केला तो दगड, गब्बरने ठाकूरचे हात कलम केले ती वेदी सगळंच नष्ट झालंय!
बाकी ठाकूर दहा वर्षांपूर्वी निवर्तले. राधा वहिनींनी वाड्यात भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्या खोलीत लावलेला, चंदनाचा हार घालेला, तुझा माऊथ ऑर्गन वाजवतानचा फोटो अजून तसाच आहे. वाहिनी रोज तो आसवांनी पुसतात आणि तुझ्या तिथीला त्यांच्याच बागेतील बकुळीच्या फुलांचा हार फोटोला चढवतात!
जेलर साहेब केव्हाच रिटायर्ड होऊन गावाला गेले. मधून मधून पत्र येतात त्यांची. ते पण आता थकले आहेत. सुरमा भोपाली इतका म्हातारा झाला तरी आपल्या कथा अजूनही सांगतो. पण कथेत जय मारला गेला हे सांगताना त्याच्या घशात आजही आवंढा येतो. तो शांतपणे मफलर ने डोळे टिपतो! बाकी रामलाल काका गेल्याच वर्षी गेले. आता राधा वाहिनी एकट्याच आहेत. पण मी किंवा बसंती रोज एक चक्कर मारतो त्यांच्याकडे.
तू मौसिकडे शब्द टाकून जमवून दिलेले माझे आणि बसंतीचे लग्न तू गेल्यावर तीन महिन्यात झाले. डोक्यावर अक्षता पडल्या तेव्हा सर्वांच्या मागे उभा राहून मला आशीर्वाद देत असलेला लंबूटांग तू फक्त मलाच दिसलास आणि ढसाढसा रडलो मी! का गेलास तू मला सोडून? आपलं ठरलं होतं ना की “ये दोस्ती हम नही तोंडेंगे?” मग? तू आम्हा दोघांना फसवलस. मला आणि मृत्यूला. तो माझ्याकडे येणार होता पण तू त्याला ओढून नेलास!
असो. बसंती मजेत आहे. ती गावातल्या उरल्यासुरल्या पोरांसाठी नाचाचे क्लास घेते. मी दारू सोडून आता शेतकरी झालो आहे. तुला म्हणून सांगतो. बसंती आज आजी झाली तरी चाळीस वर्षांपूर्वी होती तितकीच आयटम दिसते. मग तिला हा आजोबा झालेला वीरु आजही काधीतरी आमराईत नेऊन नेमबाजीचा सराव करतो! बाकी जय अमेरिकेत असतो. जय म्हणजे आमचा मुलगा. त्याच नाव आम्ही जय ठेवलंय. तुझ्यासारखाच दिलदार आहे पोरगा. त्यालाही मुलगा झालाय. त्याच नाव आम्ही जयवीर ठेवलंय!
मी गेल्याच आठवड्यात रमेशजींना पत्र लिहिले आहे. त्यांना सांगितलंय की तुमच्या शोले नंतर अनेक भ्रष्ट आवृत्त्या आल्या. पण तुमच्या शोलेच्या नखाचीही सर नाही. तेव्हा रमेशजी फॉर ओल्ड टाईम सेक, अजून एक शोले होऊन जाऊ द्या! फक्त शेवटी जय मारता कामा नये! आमची यारी जगली पाहिजे!
आणि हो मित्रा, आमच्या देव्हार्यात देव नाहीत. एकही मूर्ती किंवा तसबीर नाही. आम्ही रोज यथोचित मनापासून पूजा करतो ती त्या तुझ्या कॉईनची! आणि मागे आरती सुरु असते, “जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सब से दुश्मनी! ये दोस्ती हम नहीं तोंडेंगे!”
तुझा जिगरी,
वीरु.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈