सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
९.
आपलेच ओझे आपल्याच खांद्यावर
घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूर्खा!
स्वतः च्याच दाराशी भिक्षा मागणाऱ्या
भिक्षेकऱ्या!
समर्थपणे ओझं पेलणाऱ्या हाती ते ओझं दे
पश्चातापानं तुला परत पहावं लागणार नाही.
तुझ्या आकांक्षांच्या श्वास-स्पर्शानं
तुझ्या अंतरीच्या
ज्या ज्ञानदीपाला तू स्पर्श करतोस
तो तुझ्या श्वासातल्या फुंकरीनं
क्षणात विझून जातो.
वासनेनं माखलेल्या पापी हातातून
तू दान घेऊ नकोस
शुद्ध पवित्र प्रेमानं अर्पण केलेलंच स्वीकार.
१०.
सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्यांच्य वस्तीत तुझे चरण स्थिरावतात,
तिथेच तुझ्या पादुका असतात.
सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्यांच्या वस्तीत त्या तुझ्या चरणांच्या गाभाऱ्यापर्यंत
किती यातायात केली तरी मी वाकूनही पोहोचू शकत नाही.
सर्वात दरिद्री, पददलित आणि सर्वस्व गमावलेल्या
सामान्यांची वस्त्रे मिरवत तू जात असतोस
आमचा गर्व आम्हाला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही.
सर्वात दरिद्री, पददलित आणि निराधार असलेल्या,
सोबत हरवलेल्यांना तू सोबत देतोस.
माझ्या अंत:करणाला तिथं यायचा मार्ग सापडत नाही.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈