वाचताना वेचलेले
☆ कर्मफळ आणि नियती…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
हजारो गाई जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते, तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणार्या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात मोठमोठ्या देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यु त्यांची ताटातूट करतो. सतीसावित्रींचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्य पद लाभूनही, सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्युसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतानी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितली, तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली. मृत्यू राजा-रंक, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा काहीही भेद करीत नाही. बुद्धिबळाच्या पटावर जरी राजा, वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरीत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते. हे सारे लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्में , भगवंतस्मरण, नामस्मरण ,दानपुण्य केलं पाहिजे, कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजा पर्यंत , नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह चितेपर्यंत सोबत करतात. बरोबर येतात ती कर्में,पुण्य, भगवंत नामाचे गाठोडे—-
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈