वाचताना वेचलेले
☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 2 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
(तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!) इथून पुढे —-
थंडीच्या दिवसात बासुंदी…. उन्हाळ्यात श्रीखंड.. आम्ररस… असे. बदलत्या ऋतूप्रमाणे पदार्थ बदलत असत. त्या गंजाशेजारील वाटीत… मैदा दुधात भिजवून केलेल्या नाजूक “वळवटाच्या खिरीची” वाटी.. त्याच्याबरोबरच हाटून एकजीव केलेली “वरणाची” वाटी असायची.! त्याशेजारी ओल्या नारळाचं सारण घातलेल्या “करंज्या”… मुरडीचे पुरणाचे “कानवले”…. अन राहिलेल्या मोकळ्या जागेत… लाल तिखट- मीठ- ओवा घातलेली खुसखुशीत तिखट चव असणारी “भजी”.. अन त्याच पिठात थोडा चिंचगुळाचा कोळ घालून तळलेली हिरव्यागार पानांची “आळूवडी” …! या सर्व पदार्थांवर टप्पोरी तुळशीची पानं ठेऊन “शुद्ध” केलेला … “महानैवेद्य”.. !
या महाप्रसादानंतर हिरव्यागार पाच पानांचा, चुना- कात- सुपारी- बडीशेप- साखर- वेलदोडा- खोबऱ्याचा खिस- ज्येष्ठमध घालून, त्या पानांची विशिष्टप्रकारे घडी घालून लांबसडक लवंगेने बंद केलेला त्रयोदशगुणी “विडा” मुखशुद्धीसाठी असायचा…! असा पंचपक्वान्नाचा.. “साग्रसंगीत”… गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू ..या “आयुर्वेद शास्त्रावर” परिपूर्ण अवलंबून असणारा “षडरस”युक्त.. “महानैवेद्य” खाण्याचं परमभाग्य अनेकवेळा वाट्याला आलं…!
हा “महानैवेद्य” खाण्याचा योग पंढरपूरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांच्या नशिबी आला… काहींनी याचा आनंद रोज घेतला असेल. हा नैवेद्य खाऊन संपल्यावर ती सर्व प्रासादिक भांडी मीठ- लिंबाने घासून लखलखीत करून त्या रेशमी कापडात गुंडाळून देतानाचा “भाव” एखादी षोडशोपचारे पूजा केल्याच्या तोडीचा होता.
पूर्वी “महानैवेद्य” बडवे- उत्पातांच्या घरी एखादी “माऊली” करायची… आता मंदिराच्या मुदपाकखान्यात हा “नैवेद्य” केला जातो..!
या “महानैवेद्या”च्या प्रसादाबरोबर.. सकाळच्या न्याहरीसाठी ..आंबूस-गोड तसेच लवंग-दालचिनीच्या चवीची हिंग- जिरे- कढीपाल्याची साजूक तुपाची फोडणी घातलेली गरमागरम “कढी” अन… मऊसूत मूगडाळ- तांदळाची…. वरून भरपूर कोथिंबीर- खोबरं… मधोमध साजूक तुपाची वाटी अन वर तुळशीचं पान घातलेल्या “खिचडी”ची चव… अवर्णनीय असायची. त्याचाही कित्येकवेळा लाभ झाला. कधी कधी मधूनच सकाळी ‘रामभाऊ बडवे’ सारख्या एखाद्या “सेवाधारी” मित्राचा फोन यायचा… “मन्द्या… आज “पांडुरंगाचा” दिवस घेतलाय … किटली घेऊन ये… महापूजेचं “पंचामृत” देतो..”… ते अस्सल दूध, दही, तूप, पिठीसाखर, मध, अन वरून तुळशीची पानं घालून केलेलं प्रासादिक ‘पंचामृत’ तांब्याभर प्यायल्यावर २ -४ तास भुकेची जाणीवसुद्धा व्हायची नाही. घरातल्यांनी पोटभर पिऊन राहिलेल्या पंचामृताचे “धपाटे” पुढे दोन दिवस टिकायचे… असा “प्रसाद”.. पोटभर पुरायचा. नुसत्या “महानैवेद्या”च्या ताटावरून कापड बाजूला केलं तरी… पहाटेपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यासासारखा “सुवास” घरभर पसरायचा…! “पंचामृताच्या” किटलीचं झाकण उघडलं तरी त्यातील तुळशीच्या घमघमाटानं “गाभाऱ्यात” असल्याचा भास व्हायचा..!
एखाद्यावेळी थंडीच्या दिवसात थंडी बाधू नये म्हणून … “देवाला” दाखवलेला “सुंठ- लवंग- तुळशी”बरोबर अनेक औषधी वनस्पती घालून केलेला आयुर्वेदिक “काढा” घेऊन जायचा आग्रह एखादा मित्र करायचा…! उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यासारखीच “देवाच्या” अंगाची ‘तलखी’ होऊ नये म्हणून भल्या मोठ्या “सहाणेवर” उगाळलेला “रुक्मिणी- पांडुरंगाच्या” मूर्तीला लेप दिलेला “चंदन उटीचा” चंदनाचा गोळा कागदात गुंडाळून एखादा मित्र द्यायचा. त्या गोळ्यातील एखादा तुकडा काढून पाण्यात कालवून कपाळावर थापल्यावर मिळणारा “थंडावा” बरेच वेळा अनुभवलाय. काही काळ मूर्तीच्या अंगावर थापलेला लेप औषधाइतकाच गुणकारी आहे. बऱ्याच जणांच्या देवघराच्या एखाद्या कोनाड्यात हा पांडुरंग-रुक्मिणीच्या मूर्तीवरील “थंडावा” कागदाच्या पुरचुंडीत गुंडाळून जपून ठेवलेला असेलही…! या सगळ्या गोष्टी आम्ही पंढरपूरकरांनी “महानैवेद्या” इतक्याच “प्रासादिक” मानल्या…!
एवढं वाचल्यावर … एखाद्या निर्जीव दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या पक्वान्नांचा सोस कशाला…? असा प्रश्नही एखादा उभा करेल. पण एवढं भरलेलं ताट बघून “किती… अन काय काय खावं..?”… असा प्रश्न न पडता… “काय खावं अन कसं खावं..”… याचं उत्तर मिळालं.
ते भरलेलं “नैवैद्या”चं ताट बघून “डाव्या” बाजूचे आंबट- तुरट- खारट- तिखट- कडवट पदार्थ कमी प्रमाणात खावे… अन “उजव्या” बाजूकडील गोड पदार्थ “डाव्या”पेक्षा थोड्या जास्त प्रमाणात खावे, हे सूत्र या ताटावरून सांगितल्यासारखं वाटतं…!
समाजामध्ये वावरताना “डावं-उजवं” समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो…. हे आपलं माझं अडाणी तत्त्वज्ञान…! सांप्रत परिस्थितीत आपल्याला जे शक्य आहे त्याचा “नैवेद्य” दाखवावा या मताचा मी पण आहे. त्यासाठी अट्टाहास करायची गरज नाही. नुसत्या “शर्कराखंडखाद्यानी…” एवढ्या एखाद्या साखरेच्या दाण्यावर… भक्तवत्सल “विदुराच्या” हुलग्यावर… “चोखोबारायांच्या” शिळी भाकरी अन गाडग्यातल्या दह्याच्या दही- भाकरीच्या “काल्यावर” ही प्रसन्न होणारा आमचा “वासुदेव” आहे..! फक्त “नामदेव- चोखोबां”च्या ठायी असलेली आर्तता आपल्या अंगी आणण्याची गरज आहे. तेवढी आर्तता यायला आपल्यासारख्या मर्त्य जीवांना हजारो जन्म घ्यावे लागतील. तोपर्यंत …. ताटातली पोळी श्वानाच्या वेशात असणाऱ्या “भगवंताने” हिसकावून नेली तरी … नुसत्या कोरड्या पोळीने पोट दुखेल म्हणून.. त्याच्यामागं तुपाचं तामलं (एक भांड्याचा प्रकार) घेऊन पळत सुटणाऱ्या “संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या” इतकी भाबडी सजगता अंगी आली की… एकमेकांच्या “भुकेशी” तरी आपण एकरूप झाल्याचं समाधान लाभेल…!
बाकी आपण दाखवलेला “नैवेद्य” प्रत्यक्ष “भगवंतानं” जेवण्याइतकी आपली “हाक” मोठी नसली तरी… आर्त भावनेने… कधीतरी सणावारी केलेलं साग्रसंगीत “नैवेद्याचं” ताट उचलून देवाच्या तोंडापुढं धरून खाली ठेवताना … वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं म्हणा… किंवा धक्क्यानं म्हणा… देवाच्या डोक्यावर असणारं टप्पकन खाली पडणारं एखादं फुल असू दे.. किंवा.. एखादी ढासळणारी भाताची मूद… अथवा त्या मुदेवरून खाली घरंगळणारं “तुळशीचं पान”… जरी पडलं तरी… “खाल्ला बाबा देवानं नैवेद्य…!” — अशी “देऊळ सताड उघडं” असतानाही… अन “देऊळ बंद” असतानाही आपली भाबडी समजूत करून घेणारा … आधुनिक काळातील पाडगावकरांच्या भाषेत… “भावभोळ्या भक्तीची ही एकतारी…. भावनांचा तू भुकेला रे मुरारी…”.. म्हणणारा… भगवंतापुढं त्याच्या इतकीच गेली “अठ्ठावीस युगं” त्याच्या पायाशी बसणारा….. साधा-भोळा…”पंढरीचा वारकरी” आहे… असा विचार मनात चमकून जातो … अन अंगावर शहारे येतात…!
— समाप्त —
लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर
पंढरपूर, मो. 9422380146
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈