वाचताना वेचलेले
☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
रुक्मिणी कृष्णाला विचारते ,” आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही. असे का ? “
कृष्ण काहीही उत्तर देत नाही.
एकदा कृष्णाच्या छातीत जळजळ होत असते. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात. रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. “आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही ताबडतोब अमलात आणू.”
श्रीकृष्ण म्हणतात, ” जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा. मला बरं वाटेल. “
महालातील सर्व जण आपल्या पायाची धूळ द्यायला नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते, ” मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ ? माझी योग्यताच नाही, सात जन्म मी नरकात जाईन.”
हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते. इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुख्मिणीसारखाच विचार करतात. आणि चरणरज राजवाड्यावर पोहचत नाही.
दवंडी पिटणा-यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एक जण गोकुळात जातो.
दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात, “ काय करायला लागेल ते सांगा ! “
“ एका घमेल्यात बारीक रेती आणलेली आहे .त्यात उभे रहायचे आणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू. मात्र माती तुडवणारा प्रभूंचा खरा भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल.”
गोपी विचारतात, “ मग रुख्मिणीमातेने असे नाही केले ?”
दवंडीवाला सांगतो, ” प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल असं त्या म्हणाल्या.”
सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या, ” जर श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय, शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती इकडे.” आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.
पुढे ही माती श्रीकृष्णाच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो.
मित्रांनो हेच ते “गोपीचंदन”. याने दाह कमी होतो.
संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈