श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ आयुष्याची योग्य दिशा… सुश्री अंजली गवळी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आयुष्यात अनेकदा असं होतं की, आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच भरकटल्यासारखं वाटायला लागतं. पुढे काय करावं याची काही दिशा दिसत नाही आणि त्यातून हतबलता वाढायला लागते. कारण जे काही अनपेक्षित समोर येतं त्याबाबत आपण काही विचारच केलेला नसतो. पण त्या परिस्थितीतही पुन्हा उठून सज्ज होण्यातच खरं सामर्थ्य आहे. जो हे सामर्थ्य ओळखतो, कोणत्याही परिस्थितीवर रडण्यापेक्षा तिला सामोरं जाण्याचं धाडस दाखवतो तोच खरा नायक ठरतो.
इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते नितिन बानगुडे पाटील यांचं एक भाषण अतिशय प्रसिद्ध झालं आहे. आयुष्याला दिशा कशी द्यायची याविषयी ते मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, “जगायचं असेल तर सिंहासारखं जगता आलं पाहिजे. शेळी बनून जगण्यात अर्थ नाही. पण त्यासाठी सिंहासारखे कष्ट घेण्याची तयारीही असली पाहिजे. जर आयुष्यात काही साध्य करायचं असेल, यश मिळवायचं असेल तर पहिले त्याच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल. आपल्या क्षमता, कौशल्य, सामर्थ्य सगळ्याच्या साहाय्याने स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि मगच ध्येय ठरवलेल्या दिशेने आपण प्रवास करु शकतो. केवळ आणि केवळ अपार मेहनतीच्या जोरावरच कोणताही माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. जो कोणी हे काहीच करणार नाही तो मात्र नैराश्यात नाहीसा होईल. टिकतो तोच जो काहीतरी साध्य करतो, मिळवतो.
आयुष्यात आपण जिंकूच हा आत्मविश्वास असलं तर यश नक्कीच मिळतं. त्यासाठी स्वतःच्या क्षमतांची ओळख करुन घ्यावी, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असावी. यशस्वी तेच झाले ज्यांनी नियोजनपूर्वक काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाचं रहस्यही आपल्याला हेच सांगतं. भान राखून त्यांनी योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणल्या. आपणही स्वतःच्या क्षमता, मर्यादा जाणून नियोजन करावं आणि एकदा ते केलं की बेभान होऊन ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागावं.“
असं म्हणलं जातं की, प्रत्येक माणूस असामान्य, अलौकिक असतो. त्याला हवं ते मिळवण्याची सगळी क्षमता त्याच्यात असते. पण त्या क्षमतांची जाणीवच नसल्याने तो सामान्य बनून जगतो. खरं तर अभिमान वाटेल असं काम आपल्याला करुन दाखवता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या क्षमतांवर आपल्याला प्रचंड विश्वास असायला पाहिजे. पण नेमकं इथेच आपण कमी पडतो आणि आयुष्याला दिशा मिळण्याऐवजी दशा होऊ जाते. आपलं भविष्य कसं असणार हे ठरवणं बरंचसं आपल्या हातात असतं. जर आपण नियमित व्यायाम केला, चांगल्या लोकांमधून राहून चांगले विचार केले, ध्येयपूर्तीसाठी भरपूर मेहनत घेतली तर आयुष्याची दिशा चांगलीच असणार आहे यात काही शंकाच नाही. पण जर आपण गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहत असू, महत्त्वाची कामं करण्यात चालढकलपणा करत असू, आपल्या आयुष्याबाबतच आपल्यात प्रामाणिकपणा नसेल, अनैतिकता भरली असेल तर आपल्या आयुष्याची दिशा भरकटणारच. त्यामुळे आयुष्याला चांगल्या दिशेने न्यावं की वाईट दिशेने न्यावं हे ठरवणं आपल्या हातात आहे.
आपल्या आजूबाजूचं वातावरणही आपल्या आयुष्याला कशी दिशा मिळणार, हे ठरवत असतं. आजूबाजूला काहीही महत्त्वाकांक्षा नसलेल्या व्यक्ती असतील, कोणतंही गांभीर्य नसलेल्या व्यक्ती असतील तर आपणही हळूहळू त्यांच्यासारखंच होत असतो. हेच जर ध्येय असलेली माणसं आजूबाजूला असतील, आयुष्याबाबत गांभीर्य असलेल्या व्यक्ती असतील तर आयुष्य चांगल्याच दिशेने जाईल. आपल्याला काय हवं आहे, कसं आयुष्य हवं आहे ते ठरवून आपण संगत निवडली पाहिजे. भविष्याच्या दृष्टीने व्यवस्थित योजना आखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करता आले पाहिजेत. आपल्या आयुष्याचा उद्देश काय हे आपण एकदा लक्षात घेतलं तरी आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी मदत होऊ शकते. गरज आहे फक्त उघड्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघण्याची, ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याची आणि आपण असामान्य आहोत हे दाखवण्याचीही. हे सगळं आपण करु शकलो तर आपलं आयुष्य योग्य दिशेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो.
— ले. : अंजली गवळी
संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈