डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कालची गणपती मिरवणूक म्हणजे आजवरचा कहर होता. टिळक रोड, अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक इथे लोकांचा अक्षरशः महापूर आला होता. 

मागच्या दोन वर्षांपासून तुंबलेले खास चेंगरून घेण्यासाठी बाहेर पडलेत असं वाटत होतं. निम्म्याहून जास्त लोक दारू प्यायलेले होते, तर काही जण रस्त्यावरच उभे राहून पीत होते. या पिणाऱ्यांमध्ये मुलीदेखील मागे नव्हत्या. दारू पिऊन बेभान नाचणे, नाचून नाचून रस्त्यावरच उलट्या करणे, आणि उलट्या करून झाल्या की पुन्हा नाचणे.

स्पीकर्सच्या आवाजाबद्दल तर न बोललेलं बरं. त्या बेसमुळे अक्षरशः छाती फुटून हृदय बाहेर येईल की काय असं वाटत होतं आणि ह्या सगळ्यात हाईट म्हणजे त्या मरणाच्या गर्दीत काही पालकांसोबत त्यांच्या कडेवरची लहान मुलं देखील रेटली जात होती. ती मुलं जीवाच्या आकांताने रडत होती.

कोरोनात घरटी एक माणूस दगावल्यासारखा दगावला आहे. त्या दुःखातून बरेच जण अजून नीट सावरले नाहीयेत आणि त्यांच्याच घरासमोर ‘ पोरी जरा जपून दांडा धर ‘ वगैरे सारखी गाणी कर्कश्श आवाजात लावून विचित्र हावभाव आणि ओंगळवाणे हातवारे करत नाचणारे, एकमेकांना रेटणारे आणि असा नाच पहायला गर्दीत चेंगरत वाहत जाणारे लोक बघून कोणत्याही स्थिर मानसिकतेच्या माणसाला मळमळल्याखेरीज राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती.

‘ बाप्पाच्या आगमनाची चाहूल ‘, ‘ बाप्पा गेला की घरात पोकळी जाणवते ‘  हे सगळं त्यांनाच होतं ज्यांच्या घराजवळ एखादं सार्वजनिक मंडळ नसतं. बाकी जे मुख्य शहरात किंवा मिरवणूक मार्गावर राहणारी मंडळी आहेत त्यांना, म्हाताऱ्या माणसांना, सलग तीस-छत्तीस तास त्या गर्दीत उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांना, ज्यांना खरंच सामान्य माणूस म्हणता येईल अशा सर्व स्थिर मानसिकतेच्या लोकांना, आणि स्वतः गणपतीला देखील गणेशोत्सव संपला की हायसं वाटत असावं.

‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘, ‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत असे घाणेरडे प्रकार करणारे भक्त बघूनच गणपती बाप्पाने मागची दोन वर्षे ब्रेक घेतला असणार आहे … 

लेखक  : श्री विक्रम रजपूत, पोलीस उपनिरीक्षक

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments