सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ काय रे गजानना ? ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

काय रे गजानना?

आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता,

आता कुठं ‘ ओवाळू आरत्या ‘ नंतर ‘ चंद्रभागे मधे सोडोनीया देती ‘ जमायला लागलं होतं,

आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती,

एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या,

रिमोटसाठी भांडणाऱ्या आमचं, टिव्ही बंद करून तुझ्यासमोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं,

भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते.

साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. 

आणि एवढ्यात…?

एवढ्यात हा दिवस आणलास पण?

काल तर आलास आणि आज निघालास पण….?

….कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरू… 

जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास….

तुझ्या जाण्याच्या विषयाने पावले जड होऊन मन भरून येतं रे….

पुढच्या वर्षीही लवकरच येशील या आशेने तुला निरोप तर द्यावाच लागणार….

पण गजानना जाताना एवढं कर —

फक्त तुझ्याच नाही, तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन सर्वांना दे‌ —

भाजी भाकरी असो वा पुरणपोळी, सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे —

प्रत्येकाचं  घर आणि ताट नेहमी भरलेलं असू दे —

आणि त्या भरल्या ताटातलं अन्न पोटात जाण्याची सहजता दे —

लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे —

अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे —

अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे —

सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे —

सार स्विकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे—

भलंबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे —

शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे —

सगळ्यात महत्त्वाचं— सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे—

बहुत काय मागू गणेशा..? 🙏🏻

🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments