सौ. अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ नोबेल… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
अंधार गडद होत जाताना —आकाशाचा फळा चमचम चांदण्यानी जातो भरत,
तसे शिक्षकाच्या खात्यात जमा होत जातात विद्यार्थी.
किती तरी भावी डाॅक्टर, इंजिनियर, व्यापारी, नेते, पत्रकार व गुंडसुद्धा
अर्ध्या चड्डीत असतात त्याच्या धाकात समोर बसलेले….
त्याच्या चष्म्याचा नंबर बदलत जातो हळुहळु तसे,
अनेक चेहरे अस्पष्ट होत जातात…….
मात्र प्रार्थनेसारखे शांत, कुशाग्र ,
फंडाच्या रकमेसारखे आजारी,
वेतनवाढीसारखी आनंदी , गुणी,
व शाळा तपासणीसारखी उपद्रवी मुले नोंदवली जातात ठळक.. .. ..
सेवापुस्तकातल्या नोंदीसारखी ….
पुढे मागे भेटत राहतात, अनोळखी वळणांवरुन देत रहातात आवाज.
भर गर्दीत ,समारंभात, संमेलनात…………कुठेही.
“हे माझे सर बरं का !”
“या माझ्या मॅडम बरं का ! “.. .. ..
आपुलकीनं सांगतात सर्वांना….
गच्च भरलेल्या बसमधे
हात धरुन करतात आग्रह खिडकीपाशी बसण्याचा.
“नमस्कार करते हं !” म्हणत नव-यालाही लावतात वाकायला.. ..
तेव्हा अधोरेखित होतो त्याचा पेशा…
कसलं गारुड करतो तो पोरांवर ?
अन् स्वीकारत राहतो आयुष्यभर…
एखाद्या बुज-या आवाजाला दिलेल्या हिमतीचा…..जनस्थान पुरस्कार !
कविता शिकवतांना फुटलेल्या हुंदक्याची…… फेलोशीप !
सुंदर हस्ताक्षरासाठी दिलेल्या शाबासकीची…….. साहित्य अकादमी !
पाठीवरुन मायेनं हात फिरवल्याबद्दलचे……… ज्ञानपीठ !
अन् फळ्यासमोर चोख भूमिका बजावल्याचे…. “नोबेल !”
संग्राहिका : अंजली दिलीप गोखले
मो ८४८२९३९०११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈