वाचताना वेचलेले
☆ लाल पेन… सुश्री उज्वला आंबेकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
लोकहो, लाल पेन हे काय शीर्षक झालं ?
हं…! तर या लाल पेनाचा आणि लिहिण्याचा काही म्हणता काही संबंध नाही बरं का ! काहीकाही जणं ना या लाल पेनाचा सतत वापर करत असतात, अगदी अक्षय साठा असतो म्हणा ना !
तुम्ही कौतुकाने यांना एखादी नवी खरेदी दाखवा ! ती कितीही उत्तम असली तरी हे नापास करणार ! याच्यापेक्षा त्या कंपनीचं, या मॉडेलपेक्षा दुसरं मॉडेल् कसं चांगलं आहे, त्याचे विविध फायदे सांगणार ! त्यात काही खोड नाही काढता आली तर किंमतीत काढणार ! ही वस्तू तुम्हाला किती/कशी महाग पडली हे पटवून तुमचा खरेदीचा आनंद कमी करणार !
कपडा असेल तर रंग, पोत, किंमत काहीतरी खोड काढून तो नापास करणार ! हीच साडी अमुक ठिकाणी इतक्या किमतीला मिळते. किंवा आपल्या कपड्याच्या किंमतीचा अंदाज कमीत कमी सांगून आपला कचरा करणार !….लाल पेन!
तुम्ही प्रेमाने खास रांधलेला पदार्थ यांच्यापुढे ठेवा….लाल पेन तयार ! त्यात काय कमी/जास्त आहे, त्यात काय घालायला हवं/नको, याचे परखड परीक्षण ऐकवून हताश करणार ! ही मंडळी स्वतः पाहुणचार करताना मात्र काटकसर बाईंना आवर्जून बोलावतात !
तुमचं काही चांगलं पाहिलं की माझ्याकडे याहीपेक्षा कसं आणि किती चांगलं आहे हे सांगण्यासाठी लगेच सरसावतात ही …लाल पेनं !
एखादी भारी वस्तू, साडी, कपडा प्रेमाने यांच्यासाठी भेट म्हणून आणला तर कशाला एवढा खर्च करायचा किंवा एवढी भारी वस्तू आणायची ? असे वारंवार प्रेमाने म्हत तुमची जागा– नव्हे लायकी दाखवणार !….लाल पेन!
माझ्या लेकाने त्याच्या मित्राच्या आईला खूप प्रेमाने सुंदर किमती ड्रेस मटेरियल भेट दिले काही निमित्ताने ! प्रेम (बहुधा आमच्याकडून) आणि जाणे येणे खूप होते. नुकतीच नोकरी लागली होती त्याला ! ” कशाला रे एवढे पैसे खर्च करायचे? तुझा पगार तो काय “…..लाल पेन !
Van heusen चा टी शर्ट भेट दिला तर एकावर एक फ्री घेतला ना विचारणार हे लाल पेनवाले !
आईच्या पहिल्या स्मृतिदिनी तिच्यावर मी लेख लिहिला. त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझी मैत्रीण असलेल्या आईच्या एका सहशिक्षिकेच्या मुलीनेही लेख वाचून, तिच्या आईच्या अशाच प्रवासाची आठवण काढीत सह- अनुभूतीचा फोन केला—- नंतर एक फोन आला. “अगं,माझ्या आईने पण फिरती करून, घर सांभाळून व्यवसाय केला. अमुक केलं तमुक केलं…ब्ला ब्ला ब्ला”…लाल पेन ! अहो तुम्ही लिहा ना मग तुमच्या आईवर !
कुणी छोटी चा फोटो पोस्ट केला, साऱ्यांनी तिचे कौतुक केले की लाल पेन त्यावर रेघ ओढणार ! “आता छान दिसतेय हां “.
एखादी चांगली पोस्ट शेअर केली तर तिथेही ही लाल पेनं काहीतरी किडे टाकणार !
आमचे एक वयोवृद्ध जवळचे नातलग आम्ही आमच्यासाठी घेतलेल्या कुठल्याही वस्तूची आधी किंमत विचारणार ! किंमत ऐकून चेहरा आंबट करणार ! “अरे वा,बराच पैसा दिसतोय! “…वैषम्य..ओढली लाल पेनाने रेघ !
एक आजी संध्याकाळी ओट्यावर स्वेटर विणत असायच्या ! शेजारची नवोढा लगालगा आली. ” अय्या! आजी स्वेटर विणताय?मला पण येतं विणायला ! चाळीस स्वेटर विणलेत मी आज्जी चाळीस !”… लाल पेन…वय एकवीस!
जुनी गोष्ट !एकदा खाऊ देताना प्लॅस्टिकच्या पिशवीमधे देत होते…. ” मी ना… आजिबा..त प्लास्टिकची पिशवी वापरत नाही !अगदी विरुद्ध आहे प्लॅस्टिकच्या “…… लाल पेन…ठासून बोलले ! आपल्या बुटिकमधे ड्रेसेस देताना बुटीकचे लोगो असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच वापरतो हे लाल पेन विसरले होते !
मला हे कधीच कळले नाही,अशा सतत लाल रेघा मारून काय मिळते या व्यक्तींना? तुमच्या असल्या/ नसलेल्या चुका लग्गेच दाखवून, काहीतरी किडे करून तुमच्यापेक्षा मी कशी/ कसा श्रेष्ठ हे दाखवायची गरज का पडते ?
यातल्या काही व्यक्ती तर well offअसतात. म्हणजे त्यांना नाती,पैसा,स्वास्थ्य,कर्तुत्व,शिक्षण काही म्हणता काहीच कमी नसते. आपल्याकडे नसल्याच्या भावनेतून हे नाही घडत ! पण लाल पेनाचा दंश केल्याखेरीज यांना चैन पडत नाही !—स्वभाव म्हणावा का?
अशीच एक सधन व्यक्ती. घरी पाणी भरणारी लक्ष्मी ! त्यात या व्यक्तीचे कर्तुत्व काही नाही बरं का ! पण…..
त्या लक्ष्मीच्या जोरावर त्या व्यक्तीला नातेवाईक,साऱ्या मित्र मैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय यांना फुकटचे ,समोरच्याला मूर्खात काढत आगाऊ सल्ले देण्याचा जणू अधिकार मिळालेला आहे. ‘ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून.’.ही वृत्ती ! कुणाची मुलगी परदेशी हटके करियर करीत आहे !विशेष कामगिरीसाठी अभिनंदनाचा फोन करताना इथे भारतात काय नोकऱ्या नाहीत का अशी तिची अर्धा तास हजेरी घेणार,….हे लाल पेन ! कुणाच्या मुलाचे लग्न लांबले तर आता आधीच किती आणि कसा उशीर झालाय असे ओरखडे काढत ओळखीतली घटस्फोटित मुलगी सुचवीत, ती कशी आणि कित्ती चांगली आहे याचा इतिहास भूगोल सांगत डोके खाणार !… लाल पेन !
काही लाल पेनांच्या शब्दाशब्दातून अहंकार ठिपकत असतो. समोरच्याचे वरवरचे अतिशयोक्त कौतुक करीत लाल पेनाची खोल रेघ ओढून असे लोक आनंद मिळवतात— कुणाचे काही चांगले गुण, कर्तुत्व कळले की यांना ओवामिलची गरज पडणार ! म…ग….. तिथे ते लाल पेन खुबीने वापरतात– अमुकपेक्षा मी कसे वेगळे आणि जास्त चांगले केले आहे याचे ढोल बडवायचे. प्रत्यक्ष भेटले तरी यांची कर्कश्श जीभ लाल पेनाचे काम चराचरा करते ! मीच कसा/कशी हुशार, गुणी, सर्वगुणसंपन्न, धनिक असे सतत दाखवण्याची काही पेनांना खोड असते. असालही हो
तुम्ही ! पण दुसरे कुणी तसेच किंवा त्यापेक्षा गुणी, लायक, धनिक असू शकते ना? आपला मोठेपणा, महत्त्व सिद्ध करायला दरवेळी लाल पेन वापरायची गरज आहे ?—-
——–तुम्हाला काय वाटतं मंडळी ?
ले.: उज्वला आंबेकर
संग्राहिका : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈