सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
४८.
पाखरांच्या मंजुळ स्वरांनी
प्रभातसमयीचा शांत सागर उचंबळला,
रस्त्याकडे ची फुलं आनंदानं नाचू लागली.
ढगाढगांच्या पोकळीमधून परमेश्वराची
दौलत पसरू लागली.
मात्र या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून
आम्ही आमच्या उद्योगाला लागलो.
आनंदगीतं आम्ही गायली नाहीत की
खेळलो- बागडलो नाही.
बाजारहाट करायला आम्ही गावात गेलो नाही.
एकही शब्द आम्ही बोललो नाही,
हसलो नाही की वाटेवर रेंगाळलो नाही.
जसजसा समय जाऊ लागला तसतसा
आमच्या चालण्याचा वेग वाढत गेला.
सूर्य माथ्यावर आला.
बदकं सावलीत जाऊन गाऊ लागली.
दुपारच्या उन्हात गिरकी खात
पिकली पानं नाचू लागली.
केळीच्या झाडाखाली बसून
मेंढपाळांची पोरं पेंगू लागली,
स्वप्नात हरवून गेली
आणि मी जलाशयाशेजारच्या गवतावर
थकलेली गात्रं पसरली.
माझे सोबती उपहासानं मला हसून
ताठ मानेनं न थांबता घाईघाईनं निघून गेले.
विसाव्यासाठी ते विसावले नाहीत.
दूरच्या निळाईत ते दिसेनासे झाले.
त्यांनी किती कुरणं पार केली,
किती टेकड्या पार केल्या,
दूरचे किती मुलूख पादाक्रांत केले!
हे शूरवीरांनो, अनिर्बंध पथाच्या प्रवाशांनो,
तुमचा जयजयकार असो!
तुमची चेष्टा- मस्करी ऐकून,
त्वेषाने मला उठावेसे वाटले,
पण माझ्यात उभारी नव्हती.
अंधूक आनंदाच्या सावलीत
सुखी अवमानाच्या गहराईत मी लुप्त झालो.
सूर्यवलयांकित पोपटी निराशेनं
माझ्यावर पखरण घातली.
मी कशासाठी प्रवासास
निघालो होतो कुणास ठाऊक?
विनासायास माझं मन मात्र
छाया आणि संगीत यांना शरण गेलं.
आणि शेवटी, जाग आल्यावर मी डोळे उघडले, तेव्हा तू माझ्या बाजूला उभा होतास.
माझी निद्रा तुझ्या स्मितानं
काठोकाठ भरून टाकत होतास.
मात्र मला भिती वाटली होती. . .
तुझ्याकडे नेणारा हा प्रवास. . .
किती दीर्घ पल्ल्याचा,
कंटाळवाणा आणि कठीण असेल?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈