सौ. अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
बळे धुंधार सुटला वारा !
थोर प्रजन्य मोकळी धारा !
फडफडा पडती गारा रे !
हिंव वाजते थरार रे !! धृ !!
मेघ वोळले अंबरी !
विजु झमके तदनंतरी !
गर्जताहे नानापरी रे !
घरे उडती वरिच्या वरी रे !! १ !!
घडी मध्ये चि पाण जंजाळ !
पूर लोटले पाभळ !
नदि फुफाती चळचळ रे !
जाऊ नेदीति ओहळ रे !! २ !!
कडे कोसळती पर्वती !
जळे उदंड पडिल्या भिंती !
थंडवारे घरे गळती रे !
भूमीवर त्या पाझरती रे !! ३ !!
ऐसा प्रजन्य मांडला थोर !
गुरे निघेतना बाहेर !
केव्हा दिसेल देव दिनकर !
लोक बहुत जाले जेर रे !! ४ !!
जळे उदंडचि लोटली !
नदीतीरे पीके वाहवली !
ठांई ठांई किती बुडाली रे !
गुरे माणसे पुरे नेली रे !! ५ !!
माळवदे किती पडली !
पेवामध्ये पाण्ये भरली !
मोठी मोठी झाडे उन्मळली रे !
पिके अवघी पिंगटली रे !! ६ !!
ऐसा प्रजन्य मांडला फार !
खवळला नेणो जळधर !
तळी उचंबळली थोर थोर रे !
जेथे निघती पाझर रे !! ७ !!
कधी दिसतील उष्ण कीर्णे !
केव्हा उठेल मेघ धरणे !
जीवा होयील सुख पारणे रे !
रवि थोर तो याचकारणे रे !! ८ !!
रवि कीर्णीचा पाऊस !
लोक पावती संतोष !
रवि वेगळे कासावीस रे !
धन्य आमुचा सूर्यवंश रे !! ९ !!
— समर्थ रामदास स्वामी
संग्राहिका : अंजली दिलीप गोखले
मो ८४८२९३९०११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈