सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
५७.
प्रकाश, माझा प्रकाश,
विश्व भरून राहिलेला प्रकाश
नयनाला स्पर्श करून
ऱ्हदयाला आनंद देणारा प्रकाश
हे जीवलगा, माझ्या जीवनात
आनंद नाचून राहिला आहे
माझ्या प्रेमाच्या तारा प्रकाशात झंकारल्या आहेत.
प्रकाशामुळेच आकाश विस्तारते,
वारा बेफाट वाहतो, भूमीवर सर्वत्र हास्य पसरते.
फुलपाखरं आपल्या नौका
प्रकाशसमुद्रात सोडतात,
लिली आणि जास्मिनची फुलं फुलतात
ती प्रकाशाच्या लाटांवर!
हे प्राणसख्या, प्रत्येक ढगाच्या
सोनेरी छटेवर प्रकाश आहे
मुक्तपणे मोत्यांची उधळण करतो आहे.
पानांपानांतून अमर्याद
आनंदाची उधळण तो करतो.
स्वर्गनदी दुथडी भरून वाहते आहे.
सर्वत्र आनंद भरून राहिला आहे.
५८.
अल्लड गवत पात्याच्या तालावर
आनंदात जे सर्व पृथ्वी फुलवतं,
जन्म- मृत्यू या जुळ्या भावंडांना
जगभर ते नाचवत ठेवतं,
हसत हसत सर्व जीवन वादळीवाऱ्यातही
ते डोलवतं आणि जागं ठेवतं.
फुललेल्या लाल कमळाच्या पाकळीवर
आसूभरल्या नयनांनी ते विसावतं,
आपल्याकडं असलेलं सर्वस्व
मूकपणं जे धुळीत उधळतं,
त्या माझ्या आनंदगीताच्या सुरावटीत
सर्वानंदाचे स्वर मिळावेत.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈