मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट स्नेहाची ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ गोष्ट स्नेहाची डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

दवाखाना अगदी बंद करताना, स्नेहा घाईघाईने आली .

” मावशी, सॉरी हं जरा उशीर  झााला, पण थोडे बोलायचे होते.”

” अग बोल ना, काय आहे  प्रॉब्लेम.” 

” कुठून सुरवात करू, तेच समजत नाहीये मला….  तुम्हाला तर माहित आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, माझी जायची वेळ नक्की, पण यायची कधीच लवकर नसते हो. फार धावपळ होते माझी. तरीही, होईल ते सगळं करत असते मी.  आत्ताच प्रमोशन झालं आणि पगारही छान वाढला माझा. पण कसं सांगू , माझी मुलं सासूबाई सांभाळतात.  खूप मायाही करतात, लक्ष देतात मुलांवर.  पण परवा मी सहज भाजी केली तर अमोल म्हणाला,’ शी ! आजीसारखी नाही झाली भाजी.  मला नको ही डब्यात.’ — असं अनेक वेळा झालंय, पण मी दुर्लक्ष केलं ! पण हल्ली हे वरचेवर व्हायला लागलंय.  मुलांना माझ्या कष्टाची किंमत वाटत  नाही, असं वाटतं मला.  बघा ना, माझ्या कंपनीतून कर्ज काढून, हे मोठं घर आम्ही घेऊ शकलो. दोघं कमावतो, म्हणून हे शक्य झालंय ना ! पण– मुलं मला असं बोलली तर सासूबाईंना सूक्ष्म आनंदच होतो.  त्या त्यांना रागवत नाहीतच. शिवाय, ‘ आई, आजी कित्ती कामं करते घरात. तू तर फक्त ऑफिस मध्ये जातेस ‘  असंही अबोली म्हणाली मला. लहान आहेत अजून मुले, पण मला हे खूप लागले.— मला हा तिढा कसा सोडवावा हे समजतच नाहीये.  माझा नवरा यात काहीच बोलत नाही. मी इतकी दमते हो, की मला भांडायची शक्तीच उरत नाही…  मला आता हे सगळं झेपेनासे झालंय !  तुम्हीच सांगा ना आता काहीतरी उपाय !” — एका दमात एवढं सगळं बोलली ती . 

” स्नेहा, तुझी आई काय म्हणली यावर ?”

” ती म्हणाली, तू लक्ष देऊ नको ग.  करतात ना त्या सगळं, मग घे थोडं ऐकून. ” 

” अहो, त्यांना बाई ठेवलेली चालत नाही. कुरकुर करून देतात घालवून.  म्हणतात, 

‘ आम्हाला बाईच्या पोळ्या आवडत नाहीत. ‘ मला नाही जमत हो पोळ्या करून मग ऑफिसला ७ लाच जायला. ” 

” हे बघ स्नेहा, अजिबात रडू नकोस.  एवढी हुषार आणि गुणी मुलगी तू , अशी खचून जाऊ नकोस. हे बघ. मी सांगते ते ऐकशील का? रविवारी सुट्टी असते ना तुला, तर सगळ्यांना एकत्र बोलाव.  त्या आधीच, तुमच्या सोसायटी मधली चांगली बाई शोधून, तिला पक्की करून ठेव.  आहे का अशी कोणी ? ” 

” अहो एक मावशी आहे ना, पण सासूबाई नको म्हणतात. “

” ते सोड ग !– तर त्या बाईला भरपूर पगार कबूल कर आणि बोलवायला लाग. त्या आधी मिटिंग घे घरात. गोड शब्दात, सासूबाईंना सांग–‘ तुम्हाला खूप काम पडतं आणि आता तर मला आणखी उशीर होईल,  म्हणून मी या बाई बोलावल्या आहेत. या सर्व स्वयंपाक उत्तम करतील. समोरच्या गोगटे मावशींकडे त्याच करतात. मी चौकशी केलीय, असेही सांग.आणि हो,  मुलांना, त्यांच्या समोरच सांग,’ हे बघा, आजीला खूप काम पडतं की नाही, मग आपण त्रास नाही द्यायचा आजीला– उलट तिचा त्रास कमी करायचा . . आणि मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना , मग मी नाही सतत घरात राहू शकत. ” 

“बरं. मी खरं तर मुलांना आधीपासूनच असं  समजावत होते की , ‘ तुम्हा दोघांनाही  मागच्या महिन्यात ट्रेकला पाठवले.  तेव्हा शेजारच्या सुबोधला त्याचे आई बाबा पाठवू शकले नाहीत. ते का?  तर तेवढे पैसे ते देऊ शकणार नव्हते, हो ना अमोल? ‘ –त्यावर तो असही म्हणाला की, ‘ हो आई ! सुबोध म्हणाला सुद्धा मला की , ‘तुझी मज्जा आहे, तुझी आई पण नोकरी करते. माझे बाबा म्हणाले,  एवढे पैसे मी नाही देऊ शकत तुला.  एकट्याच्या पगारात नाही भागत बाबा.’ —मी लगेच तो धागा पकडत त्याला म्हटलं होतं की,  ‘ बघ अमोल, हे पटले ना तुला ! मग आता, आपण आजीचा भार हलका करूया. त्यासाठी आता  लीलामावशी येईल आपल्या कडे कामाला, चालेल ना ?’ — यावर मात्र तेव्हा तो काहीच बोलला नाही. “

” हे बघ स्नेहा, तू हे करून बघ.  सासूबाईंना जरा राग येईल, पण त्यांनाही मोकळीक मिळेल ग. 

आणि हो , त्यांना दरमहा पॉकेट मनी देत जा. सगळे आयुष्य कष्टात गेलेय त्यांचे…. मग बघ   चित्र कसे बदलेल ! आणि दोन वर्षातून एकदा, कुठे तरी चांगल्या कंपनी बरोबर ट्रीपलाही पाठव दोघांना. ” 

स्नेहाल बहुदा पटलं असावं. ती निघून गेली—-

—–चार महिन्यांनी ती हसत हसतच आली, आणि माझ्या हातात एक छान परफ्युमची बाटली ठेवली.

” अग हे काय, आणि कशाला?”

” सांगते ना मावशी. तुमचा सल्ला अगदी रामबाण ठरला हो. मी अगदी असेच केले.

आता तर सासूबाई इतक्या खूष असतात. पहिल्यांदा, लीलाबाईंशी उभा दावा होता. पण हळूहळू, आवडायला लागला त्यांचा स्वयंपाक ! शिवाय, मी एक मुलगीही ठेवलीय वरकाम करायला. सगळे करते ती, म्हणून घरही छान राहते. आणि सासूबाईंचीही चिडचिड होत नाही. आता तर लीला बाईंशी गट्टीच जमलीय.  तुम्ही सांगितल्या प्रमाणे, मी त्यांच्या हातात पैसे ठेवले, तर म्हणाल्या मला, ‘ कशाला ग? ‘–म्हटले अहो घ्या, सासूबाई. खूप केलेत कष्ट, आता करा खर्च मनासारखा. मावशी, हे ऐकून डोळ्यात पाणी आले हो त्यांच्या. म्हणाल्या, ‘ बाई ग. कोणीही नाही ग मला असा पॉकेट मनी दिला कधी ‘.—आता आमचे घर एकदम खूष आहे. पोरेही आता म्हणतात , ‘ आज्जी, तू आणि आजोबा जा भेळ खायला. मज्जा करा.’–मावशी, तुम्ही किती मस्त सल्ला दिलात.” —

—गोष्टी छोट्या असतात, पण लक्षातच येत नाहीत आमच्या. —

स्नेहाने मला मिठी मारली. म्हणाली, ” खूप छान सल्ला दिलात आणि माझा संसार मला परत मिळाला. नाहीतर मी खरोखरच चालले होते हो डिप्रेशन मध्ये. पण आता सगळे मस्त आहे. ”  

–आणि माझे आभार मानून स्नेहा गेली.

—-बघा ना, छोट्याशाच गोष्टी, पण अमलात आणल्या, की सुखाच्या होतात !

स्नेहाची साठा उत्तरी कहाणी सुफळ झाली. 

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈