सौ.ज्योत्स्ना तानवडे
वाचताना वेचलेले
☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजय ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
मृत्युंजय– लेखक.शिवाजी सावंत.
कर्ण — ( हस्तिनापुरची राजसभा. द्यूतात सर्वस्व हरलेले पांडव. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा दुर्दैवी प्रकार.)
अंशूकांचा ढीग सभागृहात पडू लागला. माझ्या मनात असंख्य विचारांचा ढीग पडू लागला. काय केलं मी ! बालपणापासून कडक नियमांनी आणि कष्टसाध्य प्रयत्नांनी हस्तगत केलेली चारित्र्याची धवल साधना एका क्षणात सूडाच्या काळ्या कुंडात आज मी बुडवून टाकली! कर्ण ! योध्द्यांनी गौरविलेला कर्ण ! प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्या नगरजनांच्या हृदयावर अधिराज्य करणारा कर्ण ! एकाच क्षणात भावनांच्या राज्यातील दुर्दैवी कर्ण पराजित ठरला ! शिशुपाल आणि मी, दु:शासन आणि मी, इतकंच काय पण कंस आणि मी यात कसलाच फरक नाही की काय ? या विचारानं कधी नव्हते ते माझ्या डोळ्यात टचकन अश्रुबिंदू उभे राहिले ! राजसभेतील माझ्या जीवनातले पहिलेच अश्रुबिंदू ! त्यात कारुण्य नव्हतं, भीती नव्हती, याचना नव्हती, परिणामाच्या भयानं थरथरणारी पश्चातापदग्धताही नव्हती ! आदर्श म्हणून प्राणपणानं जीवनभर उराशी कवटाळलेल्या नीतितत्वांना उरावर घेऊन अंशुकांच्या ढिगार्यात सूर्यशिष्य कर्णाचं कलेवर पाहताना खंबीर मनाचे बांध फोडून आलेली ती वेदनेची आणि यातनेची तीव्र सणक होती. अश्रुबिंदूंच्या स्वरूपात ती सणक उभी राहिली होती – तीही सूतपुत्र कर्णाच्या नेत्रांत ! सूर्यशिष्या साठी सूतपुत्राच्या डोळ्यांत अश्रू ! एक क्षणभरच मला वाटलं, मी सूतपुत्र झालो नसतो तर! कसं झालं असतं माझं जीवन !श्रीकृष्णासारखं ? का नाही ? झालंही असतं ? संस्काराच्या संघातांनी सामान्याचा असामान्य होतो. उलट कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्यांचंही घृणामय शेवाळ होतं ! कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. मी एका क्षणात या सर्व मर्यादा आज ओलांडल्या होत्या !
माझ्या डोळ्यातले ते पहिलेच अश्रुबिंदू कुरूंच्या राजसभेत घरंगळून हातांतल्या उत्तरीयावर पडून असेच विरले! ज्यांचा अन्वय सभागृहातल्या कुणालाही लागला नसता. निवळलेल्या डोळ्यांसमोर पांचाली उभी होती. घामानं डवरलेला, थकलेला दु:शासन क्षणभर थांबला. शेकडो योजनांचा प्रवास करून आलेल्या घोड्यासारखा तो धापावत होता. अंशुकांचा ढिगारा त्या दोघांपेक्षाही उंच दिसत होता. सर्व वाद्यांचा आवाज एकाएकी थांबला आणि केवळ मुरलीचेच स्वर भयाण भेदक शीळ घालू लागले. पांचालीच्या अंगावर पीतवर्णी अंशुक झळाळत होतं ! सुवर्णधाग्यांनी गुंफलेल्या वस्त्रासारखं ! मला ते पूर्वीही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं ! सर्व शक्ती एकवटून त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी दु:शासनानं हात उचलला ! पुढचे खूर उचलून मध्येच उसळणाऱ्या शुभ्र घोड्यासारखे दोन्ही हात उंचावून पितामह खाडकन उठून गरजले.
“दु:शासन, एक सूतभरही आता पुढं सरकू नको ! शिशुपालासारखा एका क्षणातच दग्ध होशील. लक्षात ठेव ते पितांबर आहे ! “
अंगी त्राण नसल्यामुळे हात खाली सोडून दु:शासन रखडत – रखडत कसातरी आपल्या आसनाजवळ आला. क्षणभर आसनाच्या हस्तदंडीवर हात टेकवून कमरेत खाली वाकला.त्याच्या स्वेदानं डवरलेल्या मस्तकावरचे दोन थेंब टपकन त्याच्याच आसनावर ओघळले. त्या स्वेदबिंदूवर तो उभ्यानंच शक्तिपात झाल्यासारखा कोसळला.आसनावर स्वेदबिंदू, स्वेदबिंदूवर दु:शासन ! शिसारीने मी मान फिरविली. माझ्या हातातील उत्तरीय केव्हाच गळून पडलं होतं. पितांबराच्या तेजस्वी वर्णापुढं त्या उत्तरीयाचा वर्ण काहीच नव्हता ! खिन्न मनानं मी खाली बसलो. कायमचा !
(अंशुक म्हणजे स्त्रियांचे वस्त्र)
श्रीकृष्ण — ( रणभूमीवर अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन कर्ण पडला ती वेळ. )
त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व-सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं ! केवळ एकट्या माझ्यावरच !!
झटकन मी पुढे झालो ! त्याच्या पाळं तुटलेल्या कानाजवळ तोंड नेत हळूच पुटपुटलो.” कौंतेया, तुझी अंतिम इच्छा ? “
त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले ! दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळलेले मला स्पष्ट दिसत होते ! कसले होते ते !
दुःखाचे ? पश्चातापाचे ? ते ; धन्यतेचे !! कृतार्थतेचे !! मी – स्वतः मी त्याला ‘कौंतेया’ म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे! तोही हळूहळू पुटपुटू लागला, ” द्वारकाधीशा… माझी अंतिम इच्छा! इच्छा की… तू – तूच माझा अंत्यसंस्कार… एका… एका… कुमारी-भूमीवर करावा!! कुमारी-भूमी!! ” त्याच्या आवाज अत्यंत क्षीण झाला होता.
“कुमारी-भूमी!! म्हणजे ?” त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो.
“होय…कुमारी! ज्या भूमीवर… कधी – कधीच…तृणांकुरसुद्धा… उगवले नसतील… उगवणार नाहीत! माझी दुःखं…ती…ती पुन्हा – पुन्हा या मर्त्य भूमीवर – कोणत्याही रूपात उगवू नयेत!!! म्हणून… ही – ही पंचमहाभूते… कुमारी-भूमीत – लय – लय…!”
त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण आणि अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो! तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले. टवकारून ऐकू लागलो. एकचित्तानं!
तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता-
” ली… ली… माता… माता… ण … न!”
तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणालाच स्पष्ट सांगता आलं नसतं! तो वृषाली म्हणत होता की पांचाली! तो कुंतीमाता म्हणत होता की राधामाता!! शोण म्हणत होता की अर्जुन!!! मी ताडलं – तो दोन्ही म्हणत होता!!!
आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले! सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो! अर्ध्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालींवरून नक्कीच सवितृ मंत्राचे, गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते!!
“ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यंऽऽऽ!” एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली! सर्वांनी श्वास रोखले! त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला! छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं! स्थिर झालं.
महान तेजस्वी असा, डोळे दिपवणाऱ्या एका प्रखर तेजाचा प्रचंड स्त्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृत्कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल-लाल सूर्यबिंबाकडे प्रचंड गतीनं झेपावला! क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्यगर्भात लय पावला!! त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले! अंधारले!
त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं!!!
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈