सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 46 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
८३.
हे माते! माझ्या दु:खाच्या अश्रूंनी
तुझ्या गळ्यात घालण्यासाठी
मी मोत्यांचा हार बनवेन.
तुझे चरण चांदण्यांच्या तेजाच्या पैंजणांनी सजवले आहेत. पण माझा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल.
संपत्ती आणि कीर्ती तूच देतेस.
ती देणं न देणं तुझ्याच हाती आहे.
पण हे दु:ख केवळ माझ्या एकट्याचं आहे.
ते तुला अर्पण करायला मी आणतो
तेव्हा तुझ्या वैभवाचं वरदान तू मला देतोस.
८४.
ताटातुटीचं दु:ख जगभर फैलावतं,
अनंत आकाशात अगणित आकार जन्मतात.
रात्रीच्या प्रहरी ताटातुटीच्या या दु:खानं
आवाज न करता तारका एकमेकींकडे पाहतात
आणि जुलैच्या पावसाच्या रात्री
अंधारात त्यांचीच गीते होतात.
सर्वत्र पसरत जाणारं हे दु:ख प्रेमात,
आनंदात,वासनांत आणि
माणसांच्या घराघरात झिरपत राहतं.
माझ्यासारख्या कवींच्या ऱ्हदयातून, गीतांच्या रूपानं सतत झरत राहतं.
८५.
आपल्या धन्याच्या प्रसादातून पहिल्यांदाच
योद्धे बाहेर पडले तेव्हा त्यांनी
आपले सामर्थ्य कुठे लपवलं होतं?
त्यांची शस्त्रं चिलखतं कुठं होती?
आपल्या धन्याच्या महालातून ज्या दिवशी
ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर बाणांचा वर्षाव झाला, तेव्हा ते किती दीनवाणे,
असहाय्य दिसत होते.
आपल्या धन्याच्या महालाकडं ते माघारी परतले
तेव्हा त्यांनी आपलं सामर्थ्य कुठं लपवलं होतं?
तलवार,बाण, धनुष्य त्यांनी फेकलं होतं.
त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती.
आपल्या आयुष्याचं साफल्य त्यांनी
धन्याच्या महाली जाताना मागेच ठेवली होती.
८६.
मृत्यू, तुझा हा चाकर,
माझ्या दाराशी आला आहे.
अनोळखी समुद्र ओलांडून आणि
तुझा सांगावा घेऊन तो आला आहे.
रात्र अंधारी आहे. मनात माझ्या भीती आहे.
तरी मी दिवा घेईन. माझा दरवाजा उघडेल,
नम्रपणे वाकून त्यांचं स्वागत करेन.
तुझा दूत माझ्या दाराशी आला आहे.
हात जोडून व साश्रू नयनांनी मी त्याला वंदन करेन. माझ्या ऱ्हदय गाभाऱ्यातील संपत्ती त्याच्या चरणांवर वाहून त्याची पूजा करेन.
आपलं काम पूर्ण करून एक काळी सावली
माझ्या प्रभात समयावर ठेवून तो परत जाईल.
माझ्या निर्जन घरात माझं निष्प्राण अस्तित्व
तुझ्या पूजेसाठी राहील.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈