वाचताना वेचलेले
☆ आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं.… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. ” माझं चुकलं ” बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटतं नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोकं आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटतं नाही. चूक बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते.आधी दुनिया खूप पुढे चाललीये, लोकं फार वेगाने धावत आहेत, आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं, पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साइड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील. हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं..आपण बरं आणि आपलं आयुष्य बरं…
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈