सौ. स्वाती रामचंद्र कोरे
वाचताना वेचलेले
☆ ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याचा किस्सा!!
श्री गणेश पुराणात अनेक चित्र विचित्र कथा आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अनेकांनी गणपतीवर काहीतरी नाविन्यपूर्ण चित्रपट काढण्याचे प्रयत्न केले आहेत. चित्रपट निर्माते शरद पिळगावकर त्यापै़कीच एक! पिळगावकरांच्या लक्षात आले की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही चित्रपट आजपर्यंत आलेला नाही. विषयाचं नाविन्य ही कोणतीही कलाकृती यशस्वी होण्याची पहिली खूण असते. चित्रपट निर्मिती हा इतका अवघड विषय आहे की प्रत्येक निर्मात्याला नवनव्या अडचणींना तोंड द्यावे लागते. निर्माता या आव्हानांना कसे सामोरे जातो यावर चित्रपट निर्मितीचा संकल्प पूर्णत्वाला जातो अथवा नाही हे ठरत असतं.
अष्टविनायक हा चित्रपटही याला अपवाद नव्हता. सुरुवातीला नायक म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आली होती. पण त्यांच्या अटी आणि सूचना पाहून पिळगावकरांनी त्यांचा नाद सोडला. आता प्रश्न होता की नायक कोण होणार? सचिन पिळगावकर यांचे त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत काम जोरात होते त्यामुळे घरीच नायक असूनही पिळगावकरांना नायक कोण हा प्रश्न पडला होता.
वडीलांची तारांबळ बघून सचिन एक दिवस म्हणाला, “मी अष्टविनायकमध्ये काम करतो. पण माझी एक अट आहे.”
आधीच विक्रम गोखलेंच्या अटींनी वैतागलेले शरद पिळगांवकर आपल्या मुलाला म्हणाले, “आता तुझ्यापण अटी? बरं, तरीपण तुझ्या अटी तर सांग.”
तेव्हा सचिन म्हणाला, “अष्टविनायक गाण्याच्या शूटींगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिग पेस्टिंग करून गाणं करायचं नाही.”
“डन”, शरद पिळगावकर म्हणाले. त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी अडचण नव्हती.
आता नायिकेचा शोध सुरु झाला. भक्ती बर्वेंपासून अनेक नावं समोर आली. पण काही केल्या ते गणित जमेना. तेव्हा सचिनच्या मातोश्रींनी नाव सुचवलं- वंदना पंडित! आता ही वंदना पंडित कोण? असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली. वंदना पंडित तेव्हा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करायची. झालं ठरलं, वंदना पंडित नायिका!
पण याच काळात तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती चित्रपटात काम करणार नाही असं तिचं उत्तर आलं. निर्मात्यांना अशा अडचणी फारशा कठीण वाटत नाहीत बहुतेक! कारण शरद पिळगावकरांनी निरोप पाठवाला, “लग्नाआधीच शूटिंग संपवलं तर?”
वंदना पंडित राजी झाली. होकार मिळाला. मुलीच्या वडीलांची भूमिका पंडित वसंतराव देशपांडे यांना द्यायचं ठरलं. पण तेव्हा वसंतरावांचे “कट्यार काळजात घुसली” चे प्रयोग जोरात चालू होते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. पण पिळगावकर माणसांना राजी करण्यात हुषारच होते. त्यांनी पंडितजींना कसतरी पटवलं.
शूटिंग मार्गी लागलं.
“आली माझ्या घारी ही दिवाळी”, ‘”दाटून कंठ येतो” ही गाणी रेकॉर्ड पण झाली. पण यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला, ज्याच्यासाठी भर मध्यरात्री पिळगांवकर दादरच्या ‘राम निवास’वर पोहचले आणि त्यांनी खालूनच हाका मारायला सुरुवात केली.
“अहो खेबुडकर. अहो खेबुडकर … “
जगदीश खेबुडकर राम निवासमध्ये राहत नव्हते. पण मुंबईत आले की त्यांचा मुक्काम रामनिवासवर असायचा हे पिळगांवकरांना माहिती होतं . आणि त्या रात्री खेबुड्कर मुंबईत आहेत हे पिळगावकरांना कळल्यावर ते थेट पोहोचलेच! पिळगावकरांना पाहून खेबुडकर खाली आले आणि चिंतेच्या सुरात विचारलं, “एवढ्या रात्री काय काम काढलंत?”
“गाडीत बसा. मग सांगतो”, पिळगांवकर म्हणाले. खेबुडकर आणखीच चिंतेत पडले.
“अष्टविनायकचं एक महत्वाचं गाणं आहे, आणि ते तुम्हीच करायचं.”
“पण अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? “
“हो, पण त्यांच्याच्यानं अष्टविनायकाचं गाणं होईना. ते तुम्हीच करणार ह्याची मला खात्री आहे.”
“अहो, पण मला अष्टविनायकांची काहीच माहिती नाही. मी त्यांपैकी एकही गणपती पाहिलेला नाही.”, खेबुडकरांनी त्यांची अडचण मांडली.
“त्याची काळजी करू नका.”, असं म्हणत पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली.
तोपर्यंत ते पिळगावकरांच्या घरी पोहोचले होते.
गाडीतून उतरता उतरता पिळगावकर म्हणाले, “खेबुडकर हे काम आज रात्रीच व्हायला हवे. उद्या रेकॉर्डिंग करायचं आहे. गणेश वर्णन लोक संगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं.”
एकेकाळी नमनाचं गाणं न ऐकलेल्या खेबुडकरांनी फक्कड लावणी लिहिली होती आणि ती गाजली पण होती. तेच खेबुडकर आता अष्टविनायकाचं गाणं लिहायला बसले होते ज्यांचं त्यांनी कधीच दर्शनही घेतलं नव्हतं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं. कागदावर श्रीकार टाकला आणि लिहायला सुरुवात केली.
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन,
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना,
अष्टविनायका तुझा महिमा कसा,
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा,
अष्टविनायका तुझा महिमा कसा,
जय गणपती, गणपती गजवदना!!
बघता बघता एकेक गणपतीचं वैशिष्ट्य-विशेष सांगता सांगता ते आठव्या गणपतीपर्यंत येऊन पोहोचले.
पाली गावच्या बल्लाळेश्वरा,
आदिदेव तू बुद्धीसागरा,
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख,
सूर्यनारायण करी कौतुक,
डाव्या सोंडेचे रूप साजिरे,
कपाळ विशाळ डोळ्यांत हिरे,
चिरेबंद या भक्कम भिंती,
देवाच्या भक्तीला कशाची भीती,
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा….
आणि ही महती लिहिता लिहिता सकाळ झाली होती. खेबुडकरांनी पेन खाली ठेवलं. पिळगांवकर त्याचीच वाट बघत होते. “आता चालीत म्हणून दाखवा.” ते म्हणाले आणि हे म्हणेपर्यंत अनिल-अरुणही येऊन पोहोचले.
सगळे प्रभादेवीच्या बाँबे साऊंड लॅबोरेटरीत पोहोचले. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मनिष वाघमारे असे गायक आधीच येऊन बसले होते. ळगांवकर खेबुडकरांना म्हणाले, “आज गायकाची जबाबदारी पण तुम्हीच पार पाडायची …”
आणि खेबुडकरांनी खडा आवाज लावला. सातव्या गणपतीपासून सुरुवात केली.
महड गावाची महसूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर..
मंदिर लई सादसूदं, जसं कौलारू घर..
घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्यावर..
सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं आहे तळं..
मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्यानी बांधलं तिथं देऊळ..
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो,
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो,
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा!!
गाणं झकास झालं. तब्बल १३ मिनिटाचं गाणं!! आधी केलेलं शूट रद्द करून गाण्याचं पुन्हा चित्रीकरण करण्यात आलं. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स होता आणि तो सुपरहिट झाला. चित्रपटाचा रौप्य महोत्सव झाला.
अष्टविनायकाचा महिमा आणखी दुमदुमतच राहीला!! अशी ही कहाणी एका रात्रीत निर्माणा झालेल्या गीताची!
संग्राहिका – सौ. स्वाती रामचंद्र कोरे
खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈