? वाचताना वेचलेले ?

☆ उकडीचा मोदक ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

उकडीचा मोदक करणे हा एक मोठा सोहळा आहे.

हा पदार्थ – पाव इंच आले, एक टेबलस्पून मीठ, ओव्हनचं टेम्परेचर, कुकरच्या शिट्ट्या … असं लिहिणार्‍या पुस्तकात बघून करता येत नाही त्यासाठी उगीच एवढंसं चिमटीभर मीठ, एक तारी पाक, मंद आच, दोन उकळ्या आणणे, कणीक थोडीशी सैलसर भिजवणे … ही भाषा यावी लागते. नारळ किसणे, कापणे, तुकडे करणे वगैरे म्हणणार्‍या मंडळीनी जरा सांभाळूनच यात पडावे. 

—-नारळ गुहागरी असतील तर चव वेगळी ….

—-राजापुरी असतील तर चव वेगळी ….

—-दापोली आसूद या बाजूची गोडी वेगळी ….

—-नारळ तारवटी असेल अजून वेगळी ….

तर हे सगळे समजून गूळ कमीजास्त करायचा असतो. 

मुळात नारळ उत्तम खवता यायला हवा. त्यात करवंटीची साल येता कामा नये. खवणीवर उकिडवं बसून खवल्यास खोबरं अधिक गोड लागतं. मधून मधून खोब-याचा तोबराही भरावा.

—-तांदूळ हा नवा असावा–.नव्या नवरी सारखा ! म्हणजे उकड ‘लग्न झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातील नवरा बायकोच्या नात्यासारखी’ छान चिकट होते. आंबेमोहोर वा बासमती तांदूळ असेल तर मोदकालाच मोद होतो—-.तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व ते शक्यतो सावलीत फडक्यावर वाळवावेत ….. ही पिठी आता जात्यावर घरी करणे अशक्य, म्हणून गिरणीत स्वतःच्या देखरेखीखाली—- भैय्याला, ” अरे भय्या, ये गहू पे मत डालो. दुसरा तांदूळ आयेगा ना पिसनेको उसके उप्पर डालो” वगैरे सांगून बारीक दळून घ्यावी.

—–गूळ अश्विनातल्या उन्हासारखा, लग्नात मामाने नेसवलेल्या अष्टपुत्रीसारखा पिवळाधमक असावा.  किसल्यानंतर ताटात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पखरण  झाली आहे असे वाटले पाहिजे.

—-खोबरे आणि गूळ यांना मंदाग्नीवर शिजत ठेवावे. खोबर्‍याच्या संगतीत गूळ हळूहळू 

विरघळत जातो व दोघे एकजीव होतात. 

—-हे होताना— चमचाभर तांदळाची पिठी व थोडी प्रत्येक दाणा वेगळा असलेली खसखस भाजून घालावी.आणि वेलदोड्याची पूड करून थोडी पखरावी. ह्या सर्व पदार्थांचे सारण तयार करावे.

—-यातील ‘कुठल्या गोष्टी किती प्रमाणात’ ते आई, आज्जी, सासुबाई, आजेसासूबाई यांनी सांगावे व नवीन सुनेने ते एकत्र परतावे.

—–जेवढे तांदळाचे पीठ तेवढेच पाणी घ्यावे. त्यात चवीला मीठ, दोन चमचे साजूक तूप व एक छटाकभर तेल घालावे. नंतर मंद आचेवर ठेवून ते ढवळावे. दोन वाफा आणाव्यात. 

—–पीठ अंतर्यामी भिजले आणि तूप-तेल यांच्या मर्दनाने शिजले पाहिजे.

—–सगळ्यात यापुढे खरी कसरत चालू होते. 

—–ही उकड मळणे हा एक खास प्रकार आहे. त्यात एकही गाठ राहता कामा नये. कुठेही आणि कशीही वळणारी या उकडीची गोगलगाय व्हायला हवी.

——लिंबाएवढी उकडीची गोळी घ्यायची आणि या गोळीवर हाताने संस्कार करायचा. मध्यभागी  ‘पुढील संसाराची जबाबदारी वाहू शकेल’ अशी थोडी मजबूत कणखर जाड ठेवून बाजूने संस्कारांचा, शिक्षणाचा दाब देऊन –तिला नाजूक, सुंदर मुलीसारख्या चिमटीने कडा दाबून चुण्या करुन सौष्ठव द्यावे.–आत सारण भरावे आणि सारणाचा भुंगा आत अडकला की कमळासारख्या पाकळ्या –म्हणजे नऊवारी नेसलेल्या या पापडीच्या नि-या अलगद, नाजूक 

हाताने मिटत न्याव्यात.

—-स्वतःचे नसले तरी मोदकाचे नाक चाफेकळी हवे. नंतर या जोडीला मोदक पात्रात घालून मस्त वाफ आणावी.

—-असा लुसलुशीत मोदक पानात वाढला की या फुलाचे नाक रूपी देठ काढून टाकावे व मगाशी वाफेमुळे गुदमरलेल्या मोदकाच्या श्वासनलिकेत साजूक तूप ओतावे. मग हळूच पूर्ण मोदक उचलून तो आपल्या अन्ननलिकेत सरकवावा——.

——-तृप्तता म्हणजे काय … याचा याची देही याची डोळा प्रत्यय घ्यावा !!!

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments