श्री विनय माधव गोखले
वाचताना वेचलेले
☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
लोकमान्य टिळकांची राजद्रोहाच्या दुसऱ्या शिक्षेत मंडाले तुरुंगात रवानगी झाली आणि काही महिन्यातच त्यांच्या सहृदयी स्वभावाचा अनुभव तुरुंगातील कैदी, तुरुंग अधिकारी आणि चक्क चिमण्यांनी सुद्धा घेतला.
लोकमान्य, त्यांना तुरुंगातून मिळणाऱ्या शिध्यातील धान्य, म्हणजे कधी डाळ तर कधी तांदूळ चिमण्यांना खायला घालत असत आणि किती तरी वेळ त्यांच्याकडे बघत असत. काही दिवसातच चिमण्यांना त्यांचा इतका लळा लागला की त्या थेट या सिंहाच्या अंगाखांद्यावर खेळत कलकलाट करू लागल्या !!!! असे काही दिवस सुरू राहिल्यावर त्या धीट झाल्या आणि खोलीत येऊन पुस्तकांवर व टेबलावर बसू लागल्या. कधी लोकमान्य जेवत असताना त्यांच्या ताटाभोवती देखील त्या गोळा होत. एकदा या चिमण्या टिळकांच्या खोलीत असताना तुरुंग अधीक्षक तेथे आला आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. लोकमान्य त्याला म्हणाले – “ आम्ही त्यांना खात नाही, आम्ही त्यांना घाबरवत नाही. उलट त्यांना खायला धान्य देतो, त्यामुळे त्या आम्हाला घाबरत नाहीत. “ . तुरुंग अधीक्षकाला या प्रसंगाची मोठी गम्मत व आश्चर्य वाटले.
काही वर्ष हा क्रम सुरु होता, टिळकांची आणि चिमण्यांची आता गट्टी जमली होती. लोकमान्यांसाठी, नियुक्त केलेला स्वयंपाकी (वासुदेव रामराव कुलकर्णी ) सातारा जिल्ह्यातील – कलेढोण गावचा राहणारा होता.
चिमण्यांच्या थव्याच्या मध्यभागी ध्यानस्थ बसलेले टिळक एखाद्या तपस्व्यासारखे वाटू लागले. सहा वर्षाची शिक्षा आता संपत आली होती, लोकमान्य टिळकांना आता घरचे वेध लागले होते. काहीशा परकेपणाने ते आपल्या कोठडीकडे पाहत होते. ठरलेली वेळ झाल्यावर चिमण्या किलबिलाट करू लागल्या. त्यांच्या खाण्याची वेळ झाली होती. टिळक उठले आणि ममतेने त्यांनी चिमण्यांना दाणे घातले आणि म्हणाले –
— “ यापुढे इतक्या विश्वासाने इथे येऊ नका, कारण इथला नवा रहिवासी कदाचित तुम्हालाच गट्ट करून टाकणारा असेल. “
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈