वाचताना वेचलेले
☆ झाकली मूठ सव्वालाखाची…अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्याला कळले… त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.
*
राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली… आता या चवन्नी छाप राजाला अद्दल घडवायचीच.
*
पुजारी हुशार होता… राजा गेल्यावर पुजार्याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला…
“राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा.”
आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का… ? पहिलीच बोली दहा हजार पासून… सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच ‘नाही परवडत’ असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.
*
तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, “महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय…”
*
राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, “हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको….”
*
तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली….
*….झाकली मूठ सव्वालाखाची….*
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈