श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

सकाळी सातची वेळ, शांतारामअण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.

अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे. ओव्हरटाईम करुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.

आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले; पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू  लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,”रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?” काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे, याहून क्लेशदायी काही नाही.

“आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?” अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले;पण त्यांना आत्ता थोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं. अण्णा दहा मिनटं झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोकवू लागला.

शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आताशा अर्ध्या अधिक दंताजींचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून रहावे लागे. त्यांचे पायही वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करुन बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच,”काय हे अण्णा? सकाळीसकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता. आत्ता पेपर घेऊन बसलात. मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आत्ता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही.”

“हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार?”

“काय ती तुमची नोकरी, अण्णा! कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आत्ता रिटायरमेंटनंतर भरघोस पेंशन मिळाली असती. पीएफ,ग्रेज्युइटी मिळाली असता. टुबीएचके घेता आला असतं आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्या वर्षी रिटायर झालेत. त्यांनी लेकाला टुबीएचके घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्महाऊस घेतलंय,एक होंडा सिटी घेतली. बढाया मारत होता लेकाचा. अण्णा, तुम्ही काय केलंत हो माझ्यासाठी?”

अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले. मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकीशेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पहात बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरून आलं. मधुराने(सुनेनं)चहा आणून दिला. तो कसातरी गळ्याखाली उतरवला त्यांनी.

अण्णांची सौ., लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं,साडीचोळी नेसवणं,आरती करणं हे सारं ती भक्तीभावाने करायची. अण्णा रिटायर्ड झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मुड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यांतून दोन मोती ठिबकले.ते पाहून मधुराला गलबलून आलं.

मधुराला वडील नव्हते; पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती.

संध्याकाळी मधुरा,मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्यसोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला, तसा मयंक मधुराशेजारी येऊन बसला. मधुराने मयंकजवळ सकाळचा विषय काढला. ती म्हणाली,”मयंक, तू लग्न झालं, तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं होतंस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे; पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला,तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाऊंट्ससाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू ‘अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?’ या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे. मयंक,अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते, ते माझ्यासारखीला विचार, जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत.”

आर्य मम्मीपप्पांजवळ कधी येवून बसला, त्यांना कळलंच नाही.

आर्य म्हणाला,”खलंच, पप्पा. तुम्ही फाल वाईट्ट वादलात आजोबांशी. आजोबा ललत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपाली जेवलेपन नाही.”

मयंकला अगदी भरुन आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला,”आपला बाथरुम मोठा आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया अण्णांसाठी आणि थोड्या वर्षांत जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेन. माझं असं कधी परत चुकलं, तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा.”

घरी गेल्यावर मयंक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसालेभात  व मठ्ठा केला. चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व  तो त्यांना ‘सॉरी’ म्हणाला.

आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला. तो आजोबांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला,”बाबा,यू आल आलवेज वेलकम.” अण्णांचे डोळे पुन्हा भरुन आले; पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते. हे तर आनंदाश्रू होते.

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, “we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same”

म्हणजे,

“आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे.”

किती सुंदर वाक्य आहे, नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे, तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत, त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखील कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो… अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

 “जिंदगी एक बार मिलती है”

  “बिल्कुल गलत है!”

सिर्फ मौत एक बार मिलती है!

 जिंदगी हर रोज मिलती है !!

  बस जीना आना चाहिए!!

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments