?  वाचताना वेचलेले ? 

☆ सौदामिनी तंत्र ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

सौदामिनी तंत्र

भारद्वाज ऋषींनी आपल्या “सौदामिनी तंत्र” या ग्रंथात विजांचे (Electricity) ५  प्रकार सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

१) रेशीम, कोल्हा, ससा किंवा मांजर या प्राण्यांचे कातडे हवेत झटकले तर उत्पन्न होते ती ‘तडित्‌’ वीज. (पाश्च्यात शास्त्रज्ञ अद्याप हिचा काहीच उपयोग करीत नाहीत.)

२) स्फटिक, रेशीम, लाख वगैरे जिनसा एकमेकांवर घासल्यावर उत्पन्न होते ती ‘सौदामिनी’ वीज.

३) आकाशात ढगात उत्पन्न होते ती ‘चपला’, हिलाच विद्युत, चंचला असेही संबोधतात.

४) विद्युतकुंभ ( Battery ) मध्ये उत्पन्न होणारी वीज ती ’शतकोटी’. * अगस्त्य ऋषी हिला ‘मित्रावरुणौ’ म्हणतात. मित्र म्हणजे धन व वरुण म्हणजे ऋण वीज होय. कार्य करण्यासाठी शंभर कुंभ वापरावे लागतात म्हणून हिला ‘शतकुंभी’ अथवा ‘शतकोटी’ असेही म्हणतात.

५) लोहचुंबकाचे फिरण्याने उत्पन्न होऊन एका भांड्यात साठवली जाणारी ती ‘हादिनी’ वीज. वीज साठवण्याच्या भांड्याला हूद (Storage Battery ) म्हणतात.

वशिष्ठ, अगस्त्य व भारद्वाज यांनी विजेच्या शास्त्रांवर ग्रंथ लिहिले आहेत. विमानशास्त्रांवर नारायण, वाचस्पति, शौनक, गर्ग व भारद्वाज यांचे ग्रंथ आहेत.

वरील माहिती श्री कृष्णाजी विनायक वझे (१८६९ – १९२९) यांच्या लेखातून घेतली आहे. श्री कृष्णाजी विनायक वझे हे इंजीनिअर होते. त्यांनी सिंधमधील सिंधू नदीवर सक्करचे प्रसिध्द धरण बांधले,  त्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ’रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. पुढे लो. टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्रज सरकारची पदवी परत केली व स्वत:ला भारतीय शिल्पशास्त्राच्या संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक भारतीय प्राचीन वास्तु शिल्प शास्त्रांच्या ग्रन्थांचा अभ्यास केला. पण दुर्दैवाने त्यांचे बरेचसे लिखाण आज काळाच्या उदरात गडप झाले आहे. सध्या त्यांचे केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या या संशोधन कार्यात ज्या प्राचीन ग्रन्थांचा अभ्यास केला ती यादी केवळ पाहिली तरी  थक्क व्हायला होते. त्यातीलही बरेचसे ग्रन्थ आज नष्ट झाले आहेत.  पण जे आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन त्यावेळी आपला समाज किती प्रगत होता याविषयी सांगताना श्री वझे म्हणतात की, “ गेल्या ३० वर्षात संस्कृत ग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावर भौतिक शास्त्रमय शिल्पात हिंदुस्तानात किती ज्ञान होते याबद्दलचा  एक निबंध मी इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला. मी आपल्या माहितीसाठी येथे इतकेच सांगतो की, वाफेच्या यंत्राखेरीज बहुतेक आधुनिक शिल्प (मशीन्स) आपल्याकडे एकेकाळी होती असे मला आढळून आले आहे.” 

आजच्या शिक्षण पद्धतीविषयी श्री वझे म्हणतात की, ” इंग्रजी राज्य हिंदुस्थानात आल्यावर इंग्रजानी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे इंग्रजी ज्ञान व त्याचा फैलाव हिंदुस्थानात झाला. तशातच सरकारी नोकऱ्यात ज्ञानापेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य प्राप्त झाल्याने प्राचीन हिंदू ज्ञानाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की, भारतात विचार करण्यासारखे ग्रंथच नाहीत व सर्व उत्तम ज्ञान काय ते पाश्चिमात्यांकडेच आहे, अशी मोठ्या समजल्या जाणाऱ्यांची समजूत झाली. ज्याप्रमाणे वेदांतात हेगेल, कांट, शोपेनहार, प्लेटो, सॉक्रेटिस, मिल, ह्यूम यांच्या वेदांताचे जितके व जसे शिक्षण दिले गेले, तसे पतंजली, कणाद, जैमिनी, बादरायण यांच्या वेदांताचे दिले गेले नाही. हीच अवस्था इतर विषयांच्या बाबतीतही झाली.”  ज्यांनी मोठमोठी राज्ये चालविली, किल्ले, कालवे, इमारती, पूल वगैरे बांधले, सूक्ष्म विचार करण्यात ज्यांची बुद्धी फार कुशाग्र अशी ज्यांची ख्याती, असे लोक भौतीक शास्त्रांशिवाय राहिले कसे ? अशी सहज येणारी शंकासुद्धा या पंडितांना आली नाही..

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments