वाचताना वेचलेले
☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवूनही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.
जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.
जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक.. उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.
बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं.. म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे
फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे, तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको.. आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.
हे नको खायला .. असं होईल, ते नको प्यायला .. तसं होईल.. ह्या टेंशनमधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे, आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत बिनधास्त खाऊनही ‘ काही नाही होत यार ‘ म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.
आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं .. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात
आता त्याला कोण काय करणार —- जगा की बिनधास्त……..
संग्राहक : श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈