सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ एक चिमुकला थेंब… कवयित्री : सुश्री भारती पांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
अचानक सरारत आलेली
पावसाची सर
क्षणार्धात विरूनही गेली.
एका चिमुकल्या पानावर
थबकून राहिलेला एक चिमुकला थेंब,
त्याच्या मनात मात्र घनघोर वादळ.
पाण्याची वाफ आणि वाफेचं पुन्हा पाणी.
एवढंच का माझं आयुष्य?
नाहीतर मग
असंच मातीत कोसळून
नि:शेष होऊन जाण्याचं?
निराशेनं थेंब किंचितसा घरंगळला.
पान खाली झुकलं.
नव्यानेच उगवलेल्या एका किरणानं
थेंबाला कवेत घेतलं…..
…… आणि लाखो प्रकाश शलाका
एकदम प्रकटल्या.
त्याच रंगांनी नटलेलं एक चिमुकलंसं
फुलपाखरू बागडत आलं
आणि ….
क्षणार्धात
तो रंगीत थेंब पिऊन
निघूनही गेलं कुठेसं…..
कवयित्री : सुश्री भारती पांडे
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈