वाचताना वेचलेले
शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई
एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले. बोट सुटायला अजून अवकाश होता, तोच त्यांना त्यांच्या गुरू रामकृष्णांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. ते विवेकानंदाना सांगत होते की “तू लगेच खाली उतर. ह्या बोटीने जावू नकोस .”
गुरूचीच आज्ञा ती, विवेकानंद लगेच खाली उतरले आणि बोट सुटली. त्यांना समजेना,गुरूजींनी त्यांना कां उतरवलं त्या बोटीतून? पुढे जाऊन ती बोट त्या प्रवासात बुडाली व सर्व प्रवाशांचा अंत झाला. विवेकानंदाना अतिशय वाईट वाटले. प्रवास संपवून ते जेव्हा रामकृष्णाना परत भेटले तेव्हा ते म्हणाले, “गुरुजी, तुम्ही मला वेळीच सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे, पण ते इतर प्रवासीही माणसंच होती की. तुम्ही तर विश्वरूप आहात.
मग तेच प्रेम सर्व प्रवासी व तो बोटवाला ह्यांच्या बाबतीत का नाही दाखवलेत…? का नाही त्याना हाक मारलीत…? का नाही त्यांना सावध केलंत आणि वाचवलंत… ? “
रामकृष्ण म्हणाले, “अरे मी असं करीन का..? तेही माझेच होते. मी त्यांना पण ओरडून सांगत होतो, पण त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. ते आपल्या अहंकारात मदमस्त होते. तुझं अंत:करण शुद्ध आहे, म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला.’ “
परमेश्वर काय किंवा सद्गुरू काय, आपल्या हृदयातच असतात. ते सतत आपल्याला योग्य काय, अयोग्य काय सांगत असतात. पण आपण आपल्याच मस्तीत एवढे दंग असतो, ह्या विषयवस्तूंच्या संसारात एवढे व्यस्त असतो, की त्यांचा आवाज ऐकूच येत नाही व मग त्याची बरीवाईट फळंही भोगावीच लागतात.
आपल्या अंत:करणशुद्धीसाठीच तर सेवा, सत्संग व साधना असते.
हे ऐकताच विवेकानंदांनी रामकृष्णांना साष्टांग प्रणाम केला.
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈