सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आमोर फाती (AMOR FATI)… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहीत नाही. मी आमोर फाती  असा करतोय.

याचा अर्थ आहे नशिबाचा स्वीकार.

आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली, तरीही ती तशी घडणे आवश्यक होते. अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्वीकारणे. ती गोष्ट आवडली नाही, तरीही ती स्वीकारणे. अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्वीकारणे.

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल, असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला “अरे, तुझ्या आईला आधी बोलाव. तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला “आग लागली, हे बरं झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाती  म्हणजे काय, याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल – आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी खऱ्या स्वरूपात आनंदाने स्वीकारणे.

६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाती  कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशीब स्वीकारण्यातली ताकद मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकद आहे, की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारणे हे तुमच्या हातात असते.

  • कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,
  • कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
  • कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,
  • कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणूक दिली असेल,
  • कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल, ज्यातून तुमची सुटका नाही.

तुम्ही हे सगळं हसत स्वीकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता, याला आमोर फाती  म्हणतात.

तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच, तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगलं वाटावं, हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्वीकारावं हा उद्देश आहे.

जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा, हा उद्देश आहे.

एखादी आपत्ती आली असताना शांत रहाणं, हे अनैसर्गिक वाटतं. पण तेव्हा शांत रहा.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नवीन उर्जा देणारं ठरेल.

बस आता, झालं तेवढं खुप झालं, असं वाटेल, तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल.

सगळं विपरीत घडत असताना ते शांत रहाणं  थिंक बिग सांगणारं ठरेल.

हताशा आली असताना ते शांत रहाणं, तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल.

 

आमोर फाती  हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करण्याचा पहिला टप्पा आहे.

कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा, आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोप्पं होतं.

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments