सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माधव आणि मधुरा घरी आल्यापासून एकदम चकित झाले होते. खरं तर न्यूझीलंडहून इन्नीअप्पांकडे हट्टानं येण्याचा निर्णय दोघांनी का घेतला होता? तर इन्नी आणि अप्पांना उतारवयात एकटं वाटू नये म्हणून! पण… इथे तर त्यांनाच एकटं पडण्याची पाळी आली होती. कशी? पाहा ना! इन्नी आणि अप्पांकडे त्या आधीच गोपाळराव आणि राधिकाबाई भिडे यांचा ठिय्या मुक्काम होता. “या राधिकाबाई भिडे. आपल्या कुटुंबसखी.” इन्नीनं ओळख करून दिली. “माझी ओळख नव्हती झाली कधी यांच्याशी.” माधव इन्नीला म्हणाला. “अरे, गेली सात वर्षे तुम्ही न्यूझीलंडला आहात. इथे आम्ही दोघं निवृत्त झाल्यावर आम्ही एक क्लब स्थापन केला. क्लबचं नावच मुळी ‘चंगळ’ क्लब. अटी तीन. एक- तुम्ही निवृत्त असायला हवेत; दोन- सुखवस्तू सांपत्तिक स्थिती असावी आणि तीन- मौज, उपभोग यात भरपूर रस असावा. तर तुला सांगते माधव, चंगळ क्लबचे नळ्याण्णव सदस्य झालेत. यात पंचेचाळीस जोड्या आहेत आणि नऊ सदस्य एकेकटे, लाईफ पार्टनर गमावलेले; पण तरीही आयुष्य आहे ते रडत जगण्यापेक्षा मजेने जगावं अशा इच्छेने आपल्यात सामील झालेले आहेत.” इन्नी म्हणाली. “मी जेव्हा इन्नींची ही जाहिरात केबल टीव्हीवर बघितली ना, तेव्हा लगेच फोन केला त्यांना. आम्ही दोघं ताबडतोब मेंबर झालो चंगळ क्लबचे. आमचा मुलगा देवर्षी अमेरिकेत आहे. कन्या सुप्रिया लग्न होऊन सध्या सिलोनला राहते. म्हणजे आपल्या आताच्या श्रीलंकेत! आम्ही दोघं अधूनमधून जातो मुलाकडे-मुलीकडे, पण करमत नाही परक्या देशात. इथेच बरं वाटतं. चंगळ क्लब सुरू झाल्यापास्नं तर इथेच उत्तम वाटतं बघ.” राधिकाबाई म्हणाल्या. माधवनं निरखून राधिकाबाई आणि आपली आई इन्नी यांच्याकडे बघितले. खरंच की, दोघी कशा तजेलदार आणि टुकटुकीत दिसत होत्या. निरामय आनंदी! समाधानी आणि संतुष्ट वाटत होत्या. “त्याचं काय आहे माधव, प्रत्येक वय हे मौजमजा एनकॅश करण्याचं असतं असं तुझ्या अप्पांचं आणि माझं स्पष्ट मत आहे. लोकलला लोंबकळून आम्ही मुलुंड ते सीएसटी तीस तीस वर्ष सर्व्हिस केली दोघांनी. पण त्यातही मजा होती. कारण दोघांनी कमावलं म्हणून तुला राजासारखं ठेवता आलं. बारावीला अपेक्षित पसेंटेज मिळाले नाही तरी प्रायव्हेटला डोनेशन देऊन शिकविता आलं. सो? नो रिग्रेट्स! पण निवृत्तीनंतर दोघांचं मस्त पेन्शन येतंय. घरदार आहेच! तू आर्थिकदृष्टीने स्वतंत्र झालायस. नो जबाबदारी! मग आता मौजच मौज का बरं करू नये? म्हणून केबलवर अँड दिली. आम्हाला ठाऊकच नव्हतं की नुसत्या मुलुंडमध्ये यवढी माणसं चंगळ’ करायला इच्छुक आहेत!” माधव आणि मधुरा यांना ते सारं ऐकून चकित व्हायला न झालं तरच नवल होतं! त्याचबरोबर इन्नी आणि अप्पांना एकटं वाटत असेल ही अपराधीपणाची टोचणीही कमी झाली होती. आपण उगाचच टेन्शनमध्ये आलो होतो हेही जाणवलं दोघांना. नंतर जेवणं फार सुखात झाली. “रोजच्या जेवणाला कुसाताई येतात स्वयंपाक करायला, पण चार माणसं येणार असली घरात की आम्ही त्यांना सांगून ठेवतो अगोदर. त्या मैनाताई म्हणून मदतनीस घेऊन येतात बरोबर. त्यांना आम्ही दिवसाचे शंभर एक्स्ट्रा देतो. खुशीनं येतात अगदी.” अप्पा सांगत होते. “आमचे मेंबर जसे वाढायला लागले तसे आम्ही ‘बिल्व’ नावाचे समविचारी लोकांचे ग्रुप तयार केले बरं का गं मधुरा. म्हणजे अगं कुणाला वाचायला आवडतं. कुणाला खादडायला आवडतं. कोणी पिक्चर, नाटक यांचं शौकीन असतं. कोणी रमीत रमतं तर कोणी मद्याचे घुटके घेत ‘एक जाम एक शाम’ करतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आम्ही काही माणसं भटकंतीवाली पण आहोत. ‘बिल्व’मध्ये समआवडींची तीनच कुटुंब एकत्र येतात. आपल्यात आम्ही, भिडे पतिपत्नी आणि शिंदे पतिपत्नी एकत्र आहेत. शिंदे सध्या बेंगलोरला मुलीच्या बाळंतपणास गेलेत दोघं. सेवेत मग्न! पण आमचे फोन चालू असतात.” इन्नीनं सांगितलं. “महिन्यातून एकदा आम्ही एकेकाकडे चार दिवस जमतो. रात्री झोपायला घरी. दिवसभर साथ साथ. आता ऑक्टोबरमध्ये आम्ही सहाही जणं कोकणात जाणारोत. डॉल्फिन शो बघायला. अगदी चंगळ आहे बघ!” अप्पा म्हणाले. “माझ्या मनात एक अभिनव कल्पना आहे.” श्रीयुत गोपाळराव भिडे म्हणाले. “हल्ली काऊन्सेलिंगचा बराच सुकाळ आहे. मॅरेजच्या आधी काऊन्सेलिंग, मरेजनंतरही प्रॉब्लेम येतात तेव्हा समुपदेशन… मुलांच्या समस्यांचं समुपदेशन, करियर कौन्सेलिंग! आता मी सुरू करतोय ‘निवृत्ती निरूपण’ यात आठ कलमी कार्यक्रम असेल. निवृत्तीआधी तीन कलम. एक – आपल्याला मिळणाऱ्या पैशांचा अंदाज घ्या. दोन- गुंतवणूक करण्यासाठी उत्कृष्ट सल्ला घ्या. तीन- आपला राहून गेलेला छंद तपासा. निवृत्तीनंतरची दोन पथ्ये- एक- घरातल्यांना न छळणे. दोन- आपल्या पार्टनरचे मन जपणे. आणि तीन गोष्टी आनंदाच्या. एक- आपल्या पैशाचा स्वतः उपभोग घ्या. दोन- समवयस्कांबरोबर ओळखी वाढवा आणि तीन- तिसरी घंटा वाजली मित्रांनो! आता मस्त चंगळ करा! चंगळ!… लाईफ इज टू शॉर्ट नाऊ!…” माधव आणि मधुरा, गोपाळराव भिडे यांच्या निवृत्ती निरूपणावर बेहद्द खूश झाले. माधव म्हणाला, “आम्हाला फार गिल्टी वाटत होतं. मी एकुलता मुलगा! इन्नी नि अप्पांना एकटं करून तिकडे दूर देशी राहतोय.” “आता काळजी करू नकोस तरुण मित्रा. चंगळ क्लब समर्थ आहे एकमेकांची काळजी घ्यायला.” भिडेकाका म्हणाले. तुम्हाला सुरू करायचा का आपल्या उपनगरात चंगळ क्लब? बघा बुवा! तिसरी घंटा वाजलीय… एन्जॉय नाऊ. ‘ऑर नेव्हर!’ म्हणायची वेळ कुणावर येऊ नये.

‘ तिसरी घंटा’ 

लेखिका – डाॅ. विजया वाड

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments