सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ वाचणाऱ्याने… कवी : सौमित्र ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
वाचणाऱ्याने
एक तरी वाचक घडवावा .. पुस्तकांच्या घरात
नाही तर त्याच्या जाण्यानंतर
पुस्तकांना वाटत राहतं बरंच काही
वाचणारा निघून जातो ज्या घरातून
त्या घरातली सारी पुस्तकं
अनाथ होतात .. एकाकी होतात
कित्येक आठवणींचे बुकमार्क्स
त्यांच्या पानापानात उगवून येतात
कधी कसं कुठून बोट धरून
शोधून आणलं त्यांना
कशी दिली हक्काची जागा
कसा किती वेळा फिरवला
हात मायेचा मुखपृष्ठांवरून
पानापानांवरून कसे सरकले डोळे
मायाळू शब्दांवरून
आपलंस करीत ओळीओळींना
कारण नसतांना
कशी काढली गेली हाताळली गेली
पुस्तकं पुन्हा पुन्हा
प्रेमळपणे उघडून मधूनच
कशी वाचली गेली पानं परिच्छेद
कितीतरी वेळा वाचलेले तरी
कसं सापडत गेलं वेगळंच काही
त्याच पुस्तकांतून
तेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचताना
कसं कसं वाचलं गेलं नव्याने
करमत नसल्यावर सहज
मारून यावी चक्कर तशा
कशा मारल्या गेल्या चकरा
उगाच पुस्तकांच्या गल्ल्यांतून
सकाळ दुपार संध्याकाळी कधीही
कशी फिरली नजर सहज
रांगेत उभ्या पुस्तकांच्या नावांवरून
किंवा एकटक पाहात रहावं
आईकडे गिल्टी होऊन
पाहिलं गेलं तसंच
पुस्तकांकडे डोळे भरून
निघून जातो वाचणारा
पुस्तकांच्या घरातून तेव्हा
पुस्तक घरी आलेल्या
पहिल्या दिवशी
पहिल्या पानावर
लिहून ठेवलेल्या सर्व तारखा
वर्षांसकट पुस्तकांबाहेर येऊन
स्तब्ध उभ्या राहातात
भविष्याची अनिश्चितता
भोवंडून येते त्यांच्या भोवताली
निघून गेल्यावर वाचणारा
पुस्तकांच्या घरातून
प्रत्येक पुस्तकाच्या
प्रत्येक लेखकाला
त्याने लिहिलेल्या
प्रत्येक व्यक्तिरेखेला
वाटत राहतं दिशाहीन
कळून चुकतं त्यांना
आपण शोभेसाठी
स्टेटस सिम्बल म्हणून
किंवा उरलो आहोत फक्त
एक अडगळ म्हणून आता
आता हळूहळू साचत जाईल धूळ
लागत जाईल वाळवी
झुरळं होतील पाली येतील
नुस्तं असणं नकोसं होईल
जगणं पिवळं पडत जाईल
ज्या घरात
दुसरं कुणीच नसतं वाचणारं
तिथल्या पुस्तकांना पडतात प्रश्न
काय उरलं आपलं या घरात
आता का रहावं इथं आपण
कारण कित्येकदा
त्यांनी ऐकलेलं असतं
काय मिळतं पुस्तकं वाचून एवढी
उपयोग काय या पुस्तकांचा
जिवंत माणूस कळत नसेल तर
चार पैसे देतात का पुस्तकं पोटासाठी
ज्या घरात
दुसरं कुणीच नसतं वाचणारं
पुस्तकांची साधी विचारपूस करणारं
त्या घरातून वाचणारा निघून जातो तेव्हा
कानकोंडी होत जातात पुस्तकं
मग त्यांना वाटू लागतं
आता आपल्याला
उत्सुकतेने पाहणारे डोळे असलेला
कानामात्रावेलांट्यांचे श्वास घेतलेला
सहज येता जाता नजर फिरवणारा
स्पर्शातूनही नुस्त्या वाचू पाहणारा
घराबाहेर असला तरी आपल्यात राहणारा
निघून गेला आहे कायमचा
तेव्हा आता आम्हालाही
रचून त्याच्यासोबत लाकडांवर
एकत्रच भडाग्नी देऊन
मिसळून जाऊ द्यावं दोघांना
वर जातांना एकमेकांत धूर होऊन
तसाही त्या माणसाने आयुष्यभर
तोच तर घेतला होता ध्यास
आमच्याशी एकरूप होण्याचा……
कवी : सौमित्र
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈