मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनोखे व्रत नवरात्रीचे…. ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  वाचताना वेचलेले ?

☆ अनोखे व्रत नवरात्रीचे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

खरं तर हा लेख नसून मनापासून केलेलं एक आवाहन आहे.

नवरात्रात अनेक व्रते केली जातात. कोणी नऊ दिवस उपवास करतात,गादीवर झोपणं वर्ज्य करतात.वहाणा वापरत नाहीत, तर कोणी नऊ दिवस जोगवा मागतात. हल्ली एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसा तो वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार धार्मिक नाही . कोण्या एका व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, ड्रेस वापरण्याची टूम काढली आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतली. प्रत्येकीला ते सहज शक्य आणि परवडणारे असतेच असे नाही. कुणीतरी असली धार्मिक आधार नसलेली प्रथा चालू करतात आणि सर्वजण ती अंधपणे आचरणात आणतात. ह्या प्रथांची रूढी बनते

 चला तर आपण नवीन प्रथा सुरू करूया. नवरात्रातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे आपण व्रत घेऊया. उतायचे नाही  मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही हे पक्के करू या.

पहिला दिवस-  या दिवशी आपण स्वतःपासून सुरुवात करुया, स्वतःचे लाडकोड स्वतः पूर्ण करू या, हवं ते खाऊया आणि आवडते छंद जोपासूया. पण मनाशी एक गोष्ट पक्की करायची की मन मारायचं नाही, कुठलीही इच्छा दडपायची नाही. कुठल्याही कारणाने पुढे ढकलायचे नाही.

दुसरा दिवस–  हा दिवस आपल्या जवळच्या लोकांचे लाड.कौतुक करण्यात घालवूया. त्यांना आठवणीने  त्यांचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवून देऊया. प्रत्येकाला हे मनापासून ऐकायचं असतं.

तिसरा दिवस–  हा दिवस देऊया मैत्रिणींना आणि स्नेह्यांना.  दुरावले असतील तर फोन करा. जवळ असतील तर एकत्र ‌जमून आनंदात वेळ घालवा. ” माझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे “ ही भावना त्यांच्यापर्यंत पोचू द्या.

चौथा दिवस-  या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करायची. ही मदत पैसे, वस्तू, शब्द कोणत्याही स्वरुपात चालेल. मग ती व्यक्ती वृद्धाश्रम- अनाथ आश्रम येथील चालेल_

पाचवा दिवस  – विद्या “ व्रत “ आहे असं म्हणूया. शिक्षणासंदर्भात जिथे जेवढी जमेल तशी मदत करू या. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्या, किंवा कुणाला काही शिकवा. शाळेला, ग्रंथालयाला मदत करा.

सहावा दिवस – हा दिवस राखून ठेवूया मुक्या प्राण्यांसाठी. ” गोशाळांना” भेट द्या. प्राण्यांना स्वतः चारा खाऊ घाला.  प्राणी संस्थांना मदत करा.

सातवा दिवस – हा दिवस निसर्गासाठी ठेवूया. एक तरी रोपटे लावूया, आणि निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखू या

आठवा दिवस – हा देशासाठी ठेवू या. माझा देश, माझे राष्ट्र, माझा जिल्हा यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करूया.  आपला परिसर स्वच्छ ठेवू या.  सरहद्दीवरील सैनिकांना दोन प्रेमाचे शब्द पाठवूया

नववा दिवस-  ” पूर्णाहुतीचा” दिवस. सर्व वाईट चालीरीती, रुढी आणि दुष्ट विचारांची आहुती देऊ या. सकारात्मक विचारांच्या  पुरणाच्या दिव्यात माणुसकीच्या ज्योती लावून त्याआदीशक्तीची आरती करु या. आपुलकीचा, एकात्मतेचा गोड प्रसाद वाटू या.

दहावा दिवस – सीमोल्लंघनाचा दिवस. आप़ण केलेल्या निर्धाराप्रमाणे, आपले मन नकारात्मक विचारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे का हे बघा. मन मोकळं करा, लिहा बोला पण व्यक्त व्हा.  कारण विचार आणि कृती बदलणे हेच खरे सीमोल्लंघन होय .मग आनंदाचा सोनेरी दसरा आपल्या आयुष्यात कायम असेल आणि प्रसन्न झालेल्या आदिशक्तीचा कृपाशिर्वाद ही पाठीशी असेल.

—-ही सगळं करताना त्या त्या दिवसाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका असे नाही.  पण नुसता कपड्याचा रंग बदलण्यापेक्षा आपले मळकट झालेले विचार बदलूया.

बोला मग हे व्रत घ्यायला आवडेल ना तुम्हाला?

आई जगदंबेचा उदो उदो

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈