वाचताना वेचलेले
☆ उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते.पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला आले असता ते म्हणाले, ” महाराज, माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली, यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन?” हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, “आपल्यावर ज्याने उपकार केले, त्याच्याजवळ जी वस्तू नाही, ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उतराई होणे होय. जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसे स्वारस्य नाही. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताचीच असल्याने दृश्य वस्तू त्याला देणे म्हणजेच त्याचेच त्याला दिल्यासारखे आहे. त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणांगती साधण्यास, मी कोणीही नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे. ती नामस्मरणाने निर्माण होते. म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा”.
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈