सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा कॅन्सर… भाग-१ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मला १९८६मध्ये पहिल्यांदा कॅन्सर झाला. त्याचा सेकंडरी प्रादुर्भाव १९८८मध्ये झाला. आता २०२१ आणि पुन्हा २०२२मध्ये कॅन्सरने परत डोके वर काढले. पहिल्या वेळेपासून आतापर्यंत मोठा अवधी मिळाला, असे मला वाटते. या काळातील हे माझे अनुभव…माझा कॅन्सर

– मंगला नारळीकर

जून १९८६च्या शेवटच्या आठवड्यात माझ्या डाव्या स्तनात दोन-तीन लहान गाठी आढळल्या, तपासणीत त्या कॅन्सरच्या असाव्यात असे ठरले, म्हणून पाच जुलै रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्या वेळचे उत्तम सर्जन डॉ. प्रफुल देसाई यांनी ऑपरेशन केले. फ्रोजन सेक्शनमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव स्पष्ट होता. तसे असेल, तर पूर्ण स्तन काढावा, की फक्त त्यातील गाठी काढून उपचार करावेत, हे सर्जननी मला आधी विचारून ठेवले होते. माझे उत्तर होते, ‘आरोग्यासाठी जे अधिक सुरक्षित असेल ते करा, रूप किंवा बांधा यांना मी फार महत्त्व देत नाही.’ सर्जननी सर्व बाजूंचे मिळून १२ नोड्स काढून तपासले. काही कॅन्सरग्रस्त, तर काही निरोगी होते. त्या वेळच्या वैद्यकीय ज्ञानाप्रमाणे केमोथेरपी, रेडीएशन आणि पोटात घेण्याच्या गोळ्या असे तिन्ही उपाय करण्याचे ठरले. ऑपरेशनच्या वेळी जवळचे नातेवाइक काळजीने हॉस्पिटलमध्ये हजर होते. त्या वेळी माझ्या आईने जयंत आणि सर्वांना समजावले, की पेशंटसमोर कुणी धीर सोडायचा नाही, रडणे वगैरे करायचे नाही. पेशंट बरी होणारच, अशी धारणा ठेवायची. ती डॉक्टर आणि वैद्य होती. तिचा हा सल्ला सगळ्यांनी मानला.

हळूहळू माझ्या कॅन्सरची बातमी इतर नातेवाइकांत पसरली. नारळीकरांच्या घरी माझे सासरे तात्यासाहेबांनी बुद्धिवादी वातावरण जोपासले होते. माझ्या माहेरी, राजवाडेघरी किंवा आजोळच्या चितळेघरी अनेक लोक फलज्योतिषावर विश्वास ठेवत. कुणी तरी नारळीकरांच्या कुळात लघुरुद्राची पूजा करावी असे सुचवले. यावेळी माझी आई म्हणत होती, की हाही उपाय करावा. ज्यामुळे रोग बरा होऊ शकतो, तो कोणताही उपाय करावा, असे तिचे म्हणणे. तिचे समाधान व्हावे म्हणून मी सुचवले, की नारळीकरांच्या कोल्हापूरच्या घरी ही पूजा करता येईल, तिथले नातेवाइक अशा पूजा करतात. आता जयंत धर्मसंकटात पडला. त्याने तात्यासाहेबांना विचारले. ते शांतपणे म्हणाले, ‘आपण लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगतो आणि आपणच असे अवैज्ञानिक उपाय करायचे, हे योग्य नाही.’ मलाही ते पटले. फलज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुण्याहून मामेभाऊ आला, त्याने एका पूजेचा नारळ व फुले आणली होती. ते सामान माझ्या हस्ते समुद्रात सोडायचे होते. मी त्याला सांगितले, ‘आम्ही असे उपाय करीत नाही. केवळ तुझ्या समाधानासाठी आपण आत्ता हे जवळच्या समुद्रात सोडू; पण असले उपाय पुन्हा सांगू नका.’ मी लवकर बरे व्हावे हे जसे माझ्या माहेरच्या लोकांना वाटत होते, तसे सासरच्या लोकांना वाटत नव्हते का? निश्चित तसे वाटत होते. तात्यासाहेबांनी त्या वेळी त्यांचे एक महिन्याचे पेन्शन, सुमारे ११०० रुपये, एका चेकने गरीब कॅन्सर पेशंटना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थेला दिले, ते मी बरी व्हावे या सदिच्छेनेच. ती सदिच्छा कशी फलद्रूप होऊ शकेल, यासाठी लोकांचे तर्क मात्र वेगवेगळे होते.

माझे वय होते ४३, मुलींची वये होती, गीता १६, गिरीजा १४ आणि लीलावती पाच वर्षे अशी. मला आणखी १५-२० वर्षांचे आयुष्य मिळाले, तर बरे होईल, मुली जबाबदार झालेल्या असतील, असे वाटत होते. घरचे सगळे लोक अगदी हादरून गेले होते. सन १९७७-७८मध्ये माझी नागपूरची मावशी लीला ठाकूर हिचे असेच ऑपरेशन झाले होते. वर्षभरात तिचा कॅन्सर लिव्हरपर्यंत पोहोचला आणि तिचे १९८०मध्ये निधन झाले. तिची नुकतीच पन्नाशी झाली होती. हा ताजा इतिहास सर्वांच्या लक्षात होता. तसाही कॅन्सर जीवघेणा असतो, हे माहीत होते, तरी आता काही जमेच्या बाजू होत्या. आम्ही मुंबईत राहत होतो आणि सगळ्या उपलब्ध वैद्यकीय उपायांचा फायदा घेता येत होता.

एकदा माझी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मैत्रीण भेटली, तिला माझा आजार समजला होता. ‘हे कसं तुला झालं बाई! तुझ्या एवढ्या हुशार आणि सज्जन नवऱ्यावर केवढी ही आफत!’ आजारी मी आणि सहानुभूती माझ्या नवऱ्याला! ती मैत्रीण चांगलीच होती; पण मनात आलेला विचार असा लगेच उघड करण्यातला विनोद मला जाणवला, तिचा राग नाही आला.माझी ‘टीआयएफआर’मध्ये राहणारी एक मैत्रीण कमला ही होमिओपॅथीची औषधे देत असे. माझ्या मुलींना आणि सासू-सासऱ्यांना तिच्या औषधांनी अनेकदा गुण आला होता. ऑपरेशननंतर काही दिवसांनी मी तिच्याकडे गेले. ती म्हणाली, की माझ्या आजाराबद्दल तिला ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच समजले; कारण माझ्या सासूबाई सकाळी तिच्याकडे गेल्या व म्हणाल्या, ‘मंगलाला कॅन्सर झालाय. आता आमचं कसं होणार, याची मला फार काळजी वाटतेय. मला बरं वाटावं म्हणून माझ्यासाठी औषध द्या.’ मी कमलाला विचारले, ‘होमिओपॅथीमध्ये कॅन्सरसाठी औषध आहे का?’ ती म्हणाली, ‘तशी औषधे सांगितलेली आहेत; पण होमिओपॅथीच्या औषधांनी अनेकदा आजार थोडा वाढतो, मग बरा होतो. तुझ्या एवढ्या गंभीर आजाराबाबत मला तो धोका पत्करायचा नाही. मी तुला कॅन्सरसाठी औषध देणार नाही.’ कमलाचा तिच्या शास्त्राबद्दल विश्वास आणि प्रामाणिकपणा, दोन्ही लक्षात राहिले.

केमोथेरपीचा शरीरावर फार परिणाम होतो, रक्तातील लाल व पांढऱ्या पेशी कमी होतात, हे ऐकले होते. अशक्तपणा येतो. पुढच्या केमोआधी रक्त भरून आले नाही, तर ती केमो देता येता नाही, पुढे ढकलावी लागते, म्हणून पेशंटला पौष्टिक अन्न दिले पाहिजे, हे समजले होते. माझी आई डॉक्टर असली, तरी तिचा जास्त अनुभव गरोदर स्त्री आणि बाळ-बाळंतीण यांचे आरोग्य सांभाळण्याचा होता. तिने मला पौष्टिक अन्न म्हणून केमोच्या दुसऱ्या दिवशी डिंकाचे लाडू दिले आणि माझे पोट बिघडले. केमोमधील औषधांचे पचनसंस्थेवर परिणाम होतात व ती एक-दोन दिवस चांगलीच बिघडलेली असते. त्या वेळी सरबत, नारळपाणी, ताक अशी पेये; त्यानंतर प्रथम मऊ भात, खिचडी अशा क्रमाने अन्नसेवन करावे. नंतर पचेल आणि रुचेल ते पौष्टिक अन्न खावे, हे मी अनुभवाने शिकले.

उपचार पूर्ण झाले. केमोची १२ इंजेक्शन झाली. मळमळणे आणि क्वचित उलटी, अशक्तपणा यांपेक्षा फार त्रास नव्हता. एक दिवस पूर्ण विश्रांतीची गरज असे. मी प्रत्येक केमोला नेव्हीनगरहून दादरला माहेरी जात असे. काकू आणि सुहासच्या देखरेखीखाली विश्रांती घेणे सुलभ होते. जवळच्या डॉ. श्रीखंडे यांच्या क्लिनिकमध्ये अनेकदा इंजेक्शन घेत असे. उपचार पूर्ण झाले, त्यानंतर चेकअपच्या वेळी डॉ. देसाई म्हणाले, ‘आता तुम्ही कॅन्सरला विसरून जा. त्याचा विचार करू नका. तुम्ही फ्री झालात गणिताचा अभ्यास करायला आणि तुमचे सगळे उद्योग करायला.’ पण, तसे व्हायचे नव्हते.

आम्ही १९८८मध्ये पॅरिस व केम्ब्रिजचा दोन महिने प्रवास करून आलो. परतल्यावर ऑगस्टमध्ये मला गळ्याच्या डाव्या बाजूला खाली, अन्ननलिकेवर हाताला दोन-तीन लहान गाठी जाणवल्या. त्यांचा गंभीरपणा जाणून लगेच मी ‘टीएमएच’मध्ये दाखवायला गेले. डॉ देसाईंच्या सहायकाने त्या लोकल भूल देऊन काढल्या व तपासायला दिल्या. त्या कॅन्सरग्रस्त होत्या. पुन्हा डॉ. देसाईंची भेट झाली, तेव्हा मी आठवण करून दिली, की त्यांनी मला कॅन्सरला विसरून जायला सांगितले होते. एवढा मोठा सर्जन खाली मान घालून म्हणाला, ‘सॉरी दॅट, अवर सायन्स इज नॉट एक्झॅक्ट लाइक युवर्स.’ मी मात्र धडा शिकले, की हा रोग फार फसवा आहे, अनेक दिवस लपून राहू शकतो आणि आपले गुणधर्म किंवा रूप बदलू शकतो. पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.

– क्रमशः भाग पहिला… 

लेखिका : सुश्री मंगला नारळीकर

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments