सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा कॅन्सर… भाग-२ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.) इथून पुढे —- 

आता मला अधिक जोरदार केमो दिली गेली. यावेळी ती इंजेक्शने घ्यायला ‘टीएमएच’मध्ये जाण्याचे ठरले. सुहास माझ्याबरोबर येत असे. प्रत्येक इंजेक्शननंतर चोवीस तास सतत उलट्या होत, मग पूर्ण थांबत. अशक्तपणा खूप असे. या वेळी मी दोन दिवस माहेरी राहून विश्रांती घेत असे. दुसऱ्या इंजेक्शननंतर खूप केस गळले, तिसऱ्यानंतर सगळेच केस गेले. एक लांब केसांचा टोप किंवा विग माझ्या भावाने कुणाकडून तरी करून आणला. एवढा मोठा विग मला फार जड होता, त्याने भारी उकडत असे. मग त्या विगचे केस कापून, आटोपशीर पोनी टेल बनवून घेतली. बाहेर जाताना मी तो लावत असे, घरात एक स्कार्फ पुरे. जानेवारी १९८९नंतर दुसरी केमो संपली, अशक्तपणा खूप होता; पण आता टामोक्सिफेनच्या गोळ्यांव्यतिरिक्त काही औषधे नव्हती. पुढे पाच-सहा महिन्यांनी बऱ्यापैकी केस आले.

आम्ही १९८९च्या जूनमध्ये पुण्यात राहायला गेलो. ‘आयुका’ची स्थापना होत होती. पुणे हे आयुर्वेद वैद्यकीचे माहेरघर. माझ्या आईचे वैद्यकीय शिक्षण आणि काम तिथेच झाले. पुण्यातील वैद्यांचे औषध घ्यावे, म्हणून मी आईचे सहकारी वैद्य भा. पु. नानल यांच्याकडे गेले. त्यांना स्पष्ट विचारले, ‘आयुर्वेदात कॅन्सरसाठी औषध दिले आहे का?’ त्यांनीही तेवढ्याच स्पष्टपणे सांगितले, की तसे औषध नाही. आयुर्वेदाची रचना झाली, तेव्हा या रोगाची आता आहे तशी माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘मी कॅन्सरसाठी औषध देणार नाही; पण या रोगाचे भयावह रूप त्याच्या शरीरात इतरत्र पसरण्यात किंवा सेकंडरीजमध्ये असते. तुझ्या शरीरात अशा सेकंडरीजना थारा मिळू नये, महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण व्हावे, म्हणून तुझे एकूण शरीर चांगले सुदृढ, टणक करण्याचा प्रयत्न करणार.’ मला त्यांचे म्हणणे पटले. मी त्यांची औषधे चार-पाच वर्षे घेतली, एकंदरीत प्रकृती चांगली झाली. नंतर त्यांच्या परवानगीने हळूहळू औषधे बंद केली. त्यानंतर २०२१च्या सप्टेंबरपर्यंत, म्हणजे १९८८च्या सेकंडरी प्रादुर्भावानंतर ३३ वर्षे मी निरोगी राहिले, त्याचे काही श्रेय मी स्ट्राँग केमोथेरपीला, काही आयुर्वेदिक औषधयोजनेला, काही माझ्या नैसर्गिक प्रकृतीला, तर थोडे श्रेय भाग्य या सर्वस्वी अज्ञात गोष्टीसाठी देते. कॅन्सरची प्रथम गाठ पडली, तेव्हा आणखी १५-२० वर्षे आयुष्य मिळेल तर बरे होईल, असे वाटत होते. नियती त्यापेक्षा बरीच दयाळू निघाली.

आपल्याला लवकरच मृत्यू येऊ शकतो, याची पहिल्या ऑपरेशननंतर जाणीव झाली. त्यानंतर माझ्या विचारांत आणि विविध गोष्टींचा अग्रक्रम लावण्यात फरक झाला. लोक काय म्हणतील, यापेक्षा मीच विचार करून काय अधिक महत्त्वाचे, अधिक चांगले ते ठरवू लागले. मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आधी करण्याचे ठरवू लागले. आधीपासून बुद्धिवादी होतेच, आता अधिक बुद्धिवादी झाले. एखाद्या गोष्टीवर माझे मत वेगळे असले, तरी ते स्पष्टपणे मांडू लागले. इंग्रजीमधील ‘आय बेग टु डिफर’ हे विधान मला आवडते. त्याचा जास्त वेळा उपयोग करू लागले. एखाद्याने चांगली गोष्ट केली, तर वेळ न घालवता, शक्य तेवढ्या लवकर शाबासकी किंवा स्तुती पोहोचवू लागले. स्वत: बुद्धिवादी असले, तरी अनेक प्रेमाच्या माणसांच्या अंधश्रद्धांकडे जास्त सहानुभूतीने पाहू लागले. ही इतकी चांगली माणसे, अंधश्रद्धांवर विश्वास का ठेवत असतील, याचे मानसशास्त्रात उत्तर मिळते का, हे पाहू लागले. लहानशा गोष्टींचा फार बाऊ करू नये, असे वाटू लागले. पूर्वीपासून मी सूर्यनमस्कार व काही योगासने करीत होते, आता हे व्यायाम अधिक नियमित करू लागले; त्यामुळे शरीर लवचिक व निरोगी राहण्यास मदत झाली.

कॅन्सरच्या पहिल्या प्रादुर्भावानंतर ३५ वर्षांची मोठी लीज मिळाली, असे मी मानते. मागे वळून पाहताना, ती चांगली वापरली गेली याचे समाधान वाटते.

तिन्ही मुलींना मोठ्या होताना, जबाबदार नागरिक म्हणून काम करताना, आपापले संसार समर्थपणे सांभाळताना पाहिले. आता नातवंडांची प्रगती पाहत आहे. जयंतच्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धपणात आम्ही आधार देऊ शकलो. जयंतचे वडील त्यांच्या आयुष्याची अखेरची १८, तर आई २४ वर्षे आमच्या घरी निवास करीत होते. घरातील जबाबदाऱ्या कमी झाल्यावर मी जयंतबरोबर अनेक देशांचा प्रवास केला, तेथील संस्कृती पाहिल्या; त्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. विविध देशांच्या अनुभवावर लहानसे पुस्तक लिहिले. माझा आवडता विषय गणित, तो जमेल तेव्हा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवला. लोकांमध्ये त्याची आवड निर्माण व्हावी, निदान भीती कमी व्हावी, म्हणून लेखन केले. पुढे ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांवर काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा शाळेतील मुलांना गणित सोपे व रोचक वाटेल असा प्रयत्न केला. ही सगळी कामे आनंद आणि समाधान देणारी होती, म्हणून मिळालेली लीज चांगली वापरली गेली असे वाटते.

आता २०२१मध्ये दुसऱ्या स्तनातही लहानशी गाठ आली, बायोप्सीमध्ये ती कॅन्सरची निघाली. मग दुसऱ्या बाजूची मास्टॅक्टोमी ३५ वर्षांनी करावी लागली. त्या वेळी पेटस्कॅनमध्ये इतरत्र कॅन्सरचा प्रादुर्भाव नाही, असे समजले होते; पण २०२२च्या जूनमध्ये सतत बारीक ताप का येतो यासाठी चिकित्सा करताना, फुप्फुसाचा कॅन्सर दिसला. त्यासाठी अर्थात केमो चालू केली. एकूण पाच इंजेक्शने दिली. सुदैवाची गोष्ट म्हणजे, १३ डिसेंबरला केलेल्या पेट स्कॅनमध्ये, आता कॅन्सरचा शरीरात प्रादुर्भाव दिसत नाही, असा अभिप्राय आला. म्हणजे पुन्हा एकदा लीज मिळाली आहे. किती मोठी, हे माहीत नाही; पण हा रोग फसवा आहे, केव्हाही परत हल्ला करू शकतो, हे माहीत आहे. आयुष्य जेवढे आहे, तेवढे त्यातल्या त्यात सुखाचे, शांतीचे असावे, असा प्रयत्न करते. पुन्हा एकदा अग्रक्रम पाहते आहे. खरोखर काय जास्त महत्त्वाचे, ते ठरवते आहे.

आयुष्यात नेहमी काही ना काही आनंद वेचता येतो, आपल्याला आशा आणि उमेद देतो, असा माझा विश्वास आहे. मंगेश पाडगावकर यांची ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी’ ही कविता आठवावी. निसर्गातील अनेक लहान लहान गोष्टींत कवीला ईश्वराची खूण दिसते, मला त्यातला जीवनानंद दिसतो. कधी कधी एखाद्या परिस्थितीत अनपेक्षित विनोद दिसतो, तो टिपला पाहिजे. विनोद हे ताण कमी करण्याचे, हसून आनंदी राहण्याचे चांगले साधन आहे. कोणी सजीव अमर नसतोच. अखेरच्या वेळी मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना फार त्रास होऊ नये, ही मनापासून इच्छा आहे. माझ्या देहाचे काही भाग कुणा व्यक्तीचे जीवन सुखाचे करणार असतील, तर तसे जरूर व्हावे, मला त्यात आनंद आहे.

— समाप्त — 

लेखिका : सुश्री मंगला नारळीकर

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments