श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ गाणं आणि कविता… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मित्राने आज विचारलं..
असा काय फरक आहे रे गाणं आणि कवितेमधला ??
मी म्हणालो…
मित्रा..
शब्दांचे अर्थ कळले.. तर गाणं
आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले.. तर कविता
‘कर्म’ म्हणून यमक जुळवलंस.. तर गाणं
आणि ‘मर्म’ म्हणून यमक जुळवलंस.. तर कविता
‘पान’ भरण्यासाठी लिहिलंस.. तर गाणं
आणि ‘मन’ भरण्यासाठी लिहिलंस.. तर कविता
पुरस्कार मिळावा म्हणून लिहिलंस.. तर गाणं
आणि लिहिल्यावर पुरस्कार मिळाला असं वाटलं.. तर कविता
काहीतरी ‘सुचलं’ म्हणून लिहिलंस.. तर गाणं
आणि काहीतरी ‘साचलं’ म्हणून लिहिलंस.. तर कविता
थोडक्यात ‘जगण्यासाठी’ लिहिलंस.. तर गाणं
आणि ‘मरण्यासाठी’ लिहिलंस.. तर कविता
आता..
तळहातावर घे सप्तरंग.. मग डोळे मिट आणि उधळून टाक दाही दिशांना.. मग डोळे उघड..
तळहाताच्या रेषांवर ‘उरलेल्या’ रंगांची नक्षी.. म्हणजे गाणं
आणि.. दिशांवर उधळलेल्या रंगांची ‘बदलत जाणारी’ नक्षी.. म्हणजे कविता
पण.. याही पलीकडे.. एखाद्या क्षितिजाच्या पार..
‘सहज’ म्हणून एखादं ‘गाणं’ लिहिता लिहिताच ‘अचानक’ डोळ्यात पाणी आलं.. तर समज.. झालं आहे एका अस्सल ‘कवितेचं’ गाणं…
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈