वाचताना वेचलेले
☆ “चिंतामुक्त कसे व्हावे?…” – लेखक : स्वामी विज्ञानानंद ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
बायको घरात फार कटकट करते म्हणून एखाद्या माणसाने घर सोडून रानात जावे, यासारखे मूर्खपण कोणते? अरे, तुला एका अबलेची कटकट वाटते, तर रानातला लांडगा तुझ्याकडे टकमक पाहात राहील, तेव्हा तुझे काय होईल? भातात खडा सापडला, म्हणून तू घरातून निघून जातो आहेस, त्या जंगलात तुलाच खाऊन टाकण्यासाठी वाघ खडा आहे.
संकटामध्ये पलायनवाद हा सोपा वाटतो; पण तो तसा नसतो. तुकाराम महाराजांच्यासारखे संत म्हणूनच सांगतात,
नको गुंतो भोगी
नको पडो त्यागी।
लावूनि सरे अंगी देवाचिया॥
सुख मिळत नाही म्हणून त्रागा करण्यापेक्षा, सुखाच्या वेळीसुद्धा तू देवाला भागीदार करून घे. म्हणजे दुःख आपोआप भागले जाईल. देवमातेच्या खांद्यावर, कडेवर तू सुरक्षित नाहीस, ही भावनाच खोटी. देवमातेच्या कडेवर एकदा बसले म्हणजे मखमलीवरून चालण्याचे सुखही त्या मातेलाच आणि मध्ये काटेरी वाटेचे बोचरे दुःखही तिलाच. यापेक्षा अधिक उत्तम मार्ग शिल्लक नाही.
संकटे काय ती सामान्य माणसाला असतात, ही समजूत खोटी आहे. संकटे भक्तांना जास्त असतात. आणि देवाच्या आयुष्यात संकटांचा कळस असतो. राम, कृष्ण, शिव, सगळ्यांच्या जीवितामध्ये संकटांचे कळस झाले. आणि तसे ते झाले म्हणून लोकांनी त्यांच्या मूर्तीवर कळस चढवून, देवमंदिरे बांधली.
संकटे यावी लागतात, ती सोसावी लागतात, त्यातच पुरुषार्थ असतो. छोट्या चमत्कारात नव्हे.
लेखक :स्वामी विज्ञानानंद
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈