सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय.  घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा: मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी. त्यामुळे तेवढंच करा, जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतंय!

एखादीची भक्ती तिच्या सुंदर रांगोळीत दिसेल तर एखादीची भक्ती देवीची स्तोत्र पठण करण्यात असेल. एखादीला मनापासून रांधून देवीला तृप्त करण्यात समाधान मिळेल. एखादीला माणसाच्या सेवेत आपली देवी भेटल्याचा आनंद मिळेल. दिवसरात्र माळ हातात घेऊन, एका डोळ्याने सुनेने सगळं केलं ना इकडे लक्ष असेल, तर ती जपमाळ काय कामाची?

जे कराल ते मनापासून पटतंय, म्हणून करा. मनावर ओझं देवी देत नाही. तिला तुम्हाला आनंदी बघायलाच आवडतं. पिढी दर पिढी चालत आलंय ते करावंच लागतं, म्हणून ओझं घेऊन करू नका. प्रेमाने सुंदर सजवलेली चार फुलं सुध्दा देवीच्या दरबारी नक्की रुजू होतात.

एक गोष्ट सांगते. कोणतीही गोष्ट करताना पुढच्या पिढीने तस्संच केलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवू नका.कदाचित त्या पिढीच्या भक्तीच्या संकल्पना वेगळ्या असतील.

बकरीच्या गोष्टीसारखं एकीने उडी मारली म्हणून दुसरीने मारली असं नको. सजगतेने सण  उत्सव साजरे करा.

माझे बाबा मला सांगत असत. दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एकत्र आलं की मनोभावे नमस्कार कर. फक्त ते मनापासून वाटू दे. एक मात्र कर. अडल्या नडल्याला मदत करताना हात आखडता घेऊ नकोस. माणसातल्या देवाला शोध. त्याची आरास कर, पूजा मांड. तिथे देवी नक्की येईल खात्री बाळग!

पूजा मीही करणार आहे. पण माझ्या मनातल्या देवीची. छान ताज्या फुलांची आरास करून.प्रसन्न देवघरात. मला जमेल तशी. कदाचित श्रीसूक्त तोंडपाठ नसेलही पण तरीही घरची गृहलक्ष्मी प्रसन्न असली की तिने घातलेली साद ऐकून माझ्याकडे आनंदाने वास करील माझी अंबाबाई, हो ना!

सूचना: नऊ  दिवस मिळालेच पाहिजेत म्हणून पाळी मागे पुढे करायला गोळ्या खाऊ नका.देवी घरातल्या सगळ्यांची आहे आणि आता बाजारात  सहज सर्व उपलब्ध असल्याने नैवेद्य करणं फार अवघड नाही.

लेखिका :मीनल सरदेशपांडे,रत्नागिरी.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments