सौ. अर्चना सुरेश देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
झोपडीच्या दारासमोर आज
हजारो दुर्गा उदास बसल्यात
बंगल्यातल्या दुर्गा नवरात्रीला
नऊ रंगाच्या साड्या नेसल्यात ….
नऊ दिवसाला नऊ रंगाच्या
साड्या नेसणे गुन्हा नाही
हजारो साड्या कपाटाची
शोभा बनणं बरं नाही ….
अंगाची अब्रू झाकण्या,
हजारो दुर्गा आहेत बेजार
कपाट तुमचं रिकाम करून
बना त्यांचा तुम्ही आधार ….
देवळातील देवीला वाहता
हजारोचे भरजरी पातळ
कधीतरी डोळे उघडून बघा
गरीब महिलांच्या साडीचे ठिगळ ….
श्रद्धेला तुमच्या विरोध नाही
तुम्ही तुमच्या जीवावर करता
मी बिचारा आपला
तुम्हाला सांगण्यापुरता ….
झोपडीत एकदा डोकावून पहा
तुमची साडी तिला नेसवा
नक्कीच सांगतो मिळणारा
आनंद नसेल फसवा ….
गरिबांच्या झोपडीत उधळा
नवरात्रीचे नऊ रंग
कधीच होणार नाही
तुमच्या भक्तीचा बेरंग ……
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈