सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. 65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली !
आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!
कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, 100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले, आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली. असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !
या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा आणि ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगतांना ‘ती’ मैत्रीण खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.
यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…
१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.
२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.
३) आपल्यासाठी वस्तू आहेत, वस्तूंसाठी आपण नाही… नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात आणि वस्तू राखण्यात जाते.
४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.
५) जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.
६) विकत घ्यायच्या आधी ‘का’, ‘कशाला’, ‘हवेच का ?’चा माप दंड लावावा.
७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.
८) दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.
९) आजचा संचय उद्याची अडगळ.
१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.
११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.
१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच.
हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.
१३) किमान गरजा ही lजीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.
१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच जात असतो.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈